गाडीची चावी दिली नाही म्हणून नवऱ्याने बायकोला केली मारहाण, पुढं घडलं असं काही की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समाजात काैटुंबिक वादातून महिलांना मारहाण करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. किरकोळ कारणांवरून नवरा-बायकोमध्ये भांडणेही होत आहेत. अशीच एक घटना साताऱ्यात घडली आहे. एका पत्नीने आपल्या पतीस वाहनाची चावी दिली नाही म्हणून रागाच्या भरात तिला मारहाण केल्याची घटना समाेर आली आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पतीच्या विरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

योगेश एकनाथ राठोड (वय 40, रा. छत्रपतीनगर, सातारा) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ राठाेड हा दारू पिऊन घरी आला. त्याने बाहेर जाण्यासाठी बायकोकडे दुचाकीची चावी मागितली. यावेळी बायकोने गाडीची चावी देण्यास नकार दिला. यावेळी त्याने तिच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. या वादा वादीतच त्याने बायकोचे डोके भिंतीवर आदळले.

यात त्या गंभीर जखमी होऊन कोसळल्या. त्यानंतर आरोपीने ‘तुला आता मी जिवंत सोडणार नाही, मारून टाकतो,’ असे म्हणून घरातील उशीने त्यांचे तोंड दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. संघश्री यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांनी तिचा पती एकनाथ राठोड याच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

ही घटना 5 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी 13 एप्रिल रोजी सातारा पोलिस ठाण्यात पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पतीच्या विरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा नोंदविल्यानंतर या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक चाबुकस्वार करीत आहेत.