Saturday, March 25, 2023

सांगली जिल्ह्यात पतीकडून पत्नीचा निर्घुण खून

- Advertisement -

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे

घरगुती वादातून पत्नीच्या मानेवर विळयाने वार करून पतीने खून केल्याची घटना वाळवा तालुक्यातील माणिकवाडी येथे घडली. उज्वला जयकर आटकेकर असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकारानंतर पती जयकर आटकेकर हा घटनास्थळावरून पसार झाला आहे. आज दुपारी ४ च्या सुमारास हा प्रकार घडला. जयकर आटकेकर हा मानसिक रूग्ण असल्याचे समजते.

- Advertisement -

माणिकवाडी येथील खडीचा भाग येथे जयकर मारूती आटकेकर हा परिवारासह वास्तव्यास आहे. जयकर व त्याची पत्नी उज्वला हे दोघे शेतामध्ये मजूरीचे काम करतात माणिकवाडी येथील उत्तम जाधव यांच्या शेतामध्ये काम करण्यासाठी हे पती-पत्नी सकाळी गेले होते. रस्त्यापासून सुमारे 100 ते 150 फुट अंतरावर काम सुरू होते. त्यांच्याबरोबर आणखी मजूर शेतामध्ये काम करत होते. दुपारच्या सुमारास इतर मजूर हे जेवण्यासाठी घरी गेले. त्यावेळी आटकेकर पती-पत्नी शेतामध्ये काम करत होते. जयकरने काम करत असणार्‍या विळयाने उज्वला हिच्या मानेवर व हातावर वर्मी घाव घातले. अचानक झालेल्या या हल्ल्याने उज्वला गंभीर जखमी झाल्या. रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याची खात्री करून पती जयकर आटकेकर याने घटनास्थळावरून पलायन केले.

या घटनेची माहिती समजताच पोलिस पाटील प्रविण नांगरे यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. आटकेकर कुटुंबिय हे मजूरी करणारे आहेत. मृत उज्वला आटकेकर यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी व एक मुलगा आहे. मुलगा मुंबई येथे शिक्षणासाठी असल्याने आटकेकर पती-पत्नी दोघेच वास्तव्यास होते. दोघांमध्ये घरगुती वाद होता. त्याचे पर्यावसन पत्नीच्या खूनामध्ये झाले.