रायगड प्रतिनिधी । रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वीकारल्या नंतर अदिती तटकरे यांनी आज प्रथमच वीर यशवंतराव घाडगे यांच्या जयंती उत्सवाला हजेरी लावून मानवंदना दिली. एक राज्यमंत्री म्हणून आणि रायगड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे, ती पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडण्याचा मी प्रयत्न करेन अशी ग्वाही त्यांनी दिली. माणगाव येथे विश्रामगृहात गेहेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चितपणे पार पाडेन. या जिल्ह्याची मुलगी म्हणून प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न आहे. महाआघाडीच्या सर्व घटकांना एकत्रित घेऊन आपल्या जिल्ह्याचे प्रश्न येत्या पाच वर्षांत पूर्णत्वास नेण्याचा निश्चय असेल, असे प्रतिपादन तटकरे यांनी व्यक्त केले.तसेच कोकण विभागाला जास्तीत जास्त निधी प्राप्त करून देणार असल्याचे जिल्ह्याची पालकमंत्री या नात्याने अदिती तटकरे यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितलं.
रायगड जिल्ह्यातील प्रश्नाबाबत पत्रकारांना उत्तर देताना त्या म्हणाल्या,” प्रलंबित प्रकल्पाबाबत काही दिवसांपूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी आढावा बैठक घेतली आहे. सभागृहाच्या पहिल्याच दिवशी आमदार अनिकेत तटकरे व मी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे आता रखडलेले प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत. त्याबाबतचे निवेदनही प्राप्त झाले आहे. येत्या १० दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात रखडलेल्या प्रलंबित प्रकल्पासंदर्भात बैठक घेणार आहोत.” अशी माहिती त्यांनी दिली.
उपजिल्हा रुग्णालयाबाबत विचारणा केली असता, शासकीय रुग्णालयात नव्याने काही सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली जाईल. जिल्हा, उपजिल्हा रुग्णालयात जी कमतरता जाणवते, त्याची माहिती मागणार असून, जी कमतरता उणीव भासते आणि रिक्त पदे आहेत, तेही भरण्यात येतील. गडकिल्ले, यात्रास्थळ, पर्यटन ठिकाणे या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितलं.