हिजाब नाही तर मग काय घालायचं? बिकनी? ओवेसी भडकले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये मतभेद असल्याने या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंडपीठामार्फत होणार आहे, मात्र याचदरम्यान एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हिजाबला विरोध करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. हिजाब नाही तर मग काय घालायचं? बिकनी? असा थेट सवाल करत त्यांनी संताप व्यक्त केला.

जेव्हा मी म्हणतो की, एक दिवस या देशाची पंतप्रधान हिजाब परिधान करणारी होईल, हे माझे स्वप्न आहे, तेव्हा अनेकांची डोकेदुखी आणि पोटदुखी होते. मी असे का म्हणू नये? हे माझे स्वप्न आहे. यात चुकीचे काय आहे? पण तुम्ही म्हणता की हिजाब घालू नये. मग काय घालावे? बिकिनी? तुम्हाला ते घालण्याचा अधिकार आहे. पण माझ्या मुलींनी हिजाब घालू नये आणि मी दाढी काढावी असे तुम्हाला का वाटते? असा सवाल ओवेसींनी केला.

मुस्लिम मुलीने हिजाब घातला तर त्याचा अर्थ तिच्यात बुद्धी कमी आहे असे नाही. आपण लहान मुलींना हिजाब घालायला भाग पाडतो, खरंच मुलींवर जबरदस्ती करतोय का? आमच्यावर आरोप केले जात आहेत की आम्ही मुलींवर दबाव आणतो. शेवटी आजच्या जगात कोण कोणाला घाबरतो? असे ओवेसी म्हणाले. जेव्हा हिंदू, शीख आणि ख्रिश्चन विद्यार्थ्याला त्यांचे धार्मिक कपडे घालून वर्गात प्रवेश दिला जातो, तेव्हा मुस्लिमांना का रोखले जात आहे? असा प्रश्नही त्यांनी केला.