गणेशोत्सवासाठी सजावटीचे सामान खरेदी करायचय? तर पुण्यातील ‘या’ बाजारपेठांना नक्की भेट द्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. भक्तांनी आपल्या बापाला घरी आणण्यासाठी आतापासूनच घराला सजवण्यासाठी सुरुवात केली आहे. यामुळेच बाजारपेठांमधील गर्दी वाढली आहे. सध्या गणेश उत्सवानिमित्त सजावटीच्या सामानांनी, गौरी गणपतीच्या दाग दागिन्यांनी, शोभेच्या वस्तूंनी, फुलामाळांनी बाजारपेठा गजबजले आहेत. सर्वच ठिकाणी गौरी गणपती उत्सवासाठी लागणाऱ्या सामानांची विक्री सुरू झाली आहे. परंतु अनेक ठिकाणी सजावटीच्या वस्तू महाग विकल्या जात आहेत. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला पुण्यातील अशी 5 ठिकाणे सांगणार आहोत जिथे योग्य दरात आणि चांगल्या क्वालिटीत गौरी गणपतीच्या सजावटीचे सामान मिळेल.
पुण्यातील 5 महत्वाच्या बाजारपेठा
बोहरी अळी – बुधवार पेठेतील बोहरी अळीमध्ये गौरी गणपती सणानिमित्त लागणारे सर्व सामान अगदी योग्य दरात उपलब्ध आहे. सुंदर अशा वस्तू रांगोळ्या वेगवेगळ्या लाईट, दाग दागिने अशा आपल्याला हव्या त्या सर्व वस्तू या आळीमध्ये उपलब्ध आहेत. दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त ही आळ गजबजलेली असते. अनेक भक्त लोक लांबून या ठिकाणी खरेदीसाठी येतात. त्यामुळे येथे योग्य दरात सर्वसामान्यांचे खरेदी विक्री केली जाते.
तुळशीबाग – आपल्या सर्वांनाच पुण्यातील प्रसिद्ध असलेली तुळशीबाग माहित आहे. या तुळशी बागेत गणेशोत्सवानिमित्त लागणारे सर्व साहित्य अगदी योग्य दरात आणि चांगल्या क्वालिटीमध्ये सहज मिळून जाते. उलट आपल्याला या ठिकाणी वस्तूंच्या किमती कमी करून देखील त्या खरेदी करता येऊ शकतात. गौरीसाठी लागणारे दागिने गणपतीची आरास सजावटीच्या वस्तू अशा सर्व गोष्टी तुळशीबागेत मिळून जातात. तुळशीबागे जवळच दगडूशेठ गणपती असल्यामुळे येथे गणपती बाप्पासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू सहज मिळून जातात.
महात्मा ज्योतिबा फुले मंडई– महात्मा ज्योतिबा फुले मंडई तर बाराही महिने फुल गर्दी असते. आपण कोणत्याही वेळेस या मंडळीत गेलो तर आपल्याला हव्या त्या वस्तू येथे सहज मिळून जातात. मुख्य म्हणजे, सणासुदीच्या काळात तर या मंडईत तुफान गर्दी असते. त्यामुळे या मंडळी देखील गणेश उत्सवानिमित्त सर्व सामान विक्रीसाठी उपलब्ध असते. आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सर्व गोष्टी मंडईत मिळून जातात. ताज्या फुलांच्या हारांसह ते शोभेच्या वस्तूंपासून सगळं काही आपल्याला येथे मिळून जातात.
रविवार पेठ – पुण्यातील होलसेल मार्केट म्हणून प्रसिद्ध असलेल्या रविवार पेठेत आपल्याला हव्या त्या गोष्टी सहज मिळून जातात. जर तुम्हाला गणपती बाप्पा साठी किंवा त्याच्या सजावटीसाठी काही गोष्टींची खरेदी करायचे आहे तर तुम्ही रविवार पेठेत नक्की जावा. कपडे, साहित्य, दाग दागिने, शोभेच्या वस्तू या सर्व गोष्टी रविवार पेठेत उपलब्ध आहेत.
तपकिर गल्ली – गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये लाइटिंग करायची असेल तर तुम्ही तपकीर गल्लीत नक्की जावा. या गल्लीमध्ये तुम्हाला लाइटिंग च्या संदर्भातील सर्व काही गोष्टी सहज मिळून जातील. तुम्हाला जर एका मोठ्या मंडळाला लायटिंग करायची असेल आणि त्यासाठी साहित्य आवश्यक असेल तर ते साहित्य तुम्हाला तपकीर गल्लीत मिळेल. सुंदर लॅम्प असो किंवा रंगबिरंगी लाईटी आपल्याला तपकिर गल्लीत मिळतील.