हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सदस्यांसाठी PF काढण्याच्या नियमात काही महत्वाचे बदल केले आहेत. या नियमानुसार, इथून पुढे ईपीएफओ सदस्यांना बँक पासबुक किंवा चेक लीफची कॉपी देण्याची गरज नसेल. यापूर्वी EPFO कडून क्लेम मिळविण्यासाठी ग्राहकांना चेकबुकचा फोटो देणे बंधणकारक होते. परंतु इथून पुढे बँक पासबुक किंवा चेक लीफची प्रत द्यावी लागणार नाही.
EPFO च्या नव्या नियमामुळे, इथून पुढे ऑनलाइन क्लेम व्हेरिफिकेशन बँक पासबुक किंवा चेक लीफच्या इमेजशिवाय केले जाईल. यामुळे ऑनलाईन क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया वेगवान होणार आहे. EPFO ने 8 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हणले आहे की, EPFO चे दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी अनेक ठिकाणी क्लेम सेटलमेंट ऑफिसेस सुरु करण्यात येणार आहेत. यामुळे देखील कामकाजाच्या प्रक्रियेचा वेग वाढेल.
दरम्यान, EPFO ने PF खातेधारकांच्या मृत्यूच्या दाव्याचे नियम ही सोपे केले आहेत. यामुळे कोणत्याही खातेधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला पैसे सहज मिळतील. EPFO ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार जर PF खातेधारकाचा मृत्यू झाला आणि त्याचे खाते आधारशी लिंक केलेले नसेल किंवा पीएफ खात्यामध्ये टाकलेली माहिती आधार कार्डशी जुळत नसेल, तर अशा परिस्थितीत देखील खात्यात जमा केलेली रक्कम नामांकित व्यक्तीला दिली जाणार नाही. अशा परिस्थितीत प्रथम संपूर्ण चौकशी केली जाईल. यानंतर रक्कम देण्यात येईल.