राष्ट्रवादी नेमकी कोणाची? सुप्रीम कोर्टाचे नार्वेकरांना महत्त्वाचे निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल दिला आहे. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालाकडे लागले आहे. याच प्रकरणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार प्रकरणाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल देण्याचे आदेश राहूल नार्वेकरांना दिले आहेत. त्यामुळे आता लवकरच राष्ट्रवादी नेमकी कोणाची असेल? हे सिद्ध होणार आहे.

15 फेब्रुवारीपर्यंत निकाल द्या

यापूर्वीच्या सुनावणीवेळी राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाला निकाल देण्याबाबत आणखीन वेळ मागितली होती. परंतु आज झालेल्या सुनावणीत नार्वेकरांची ही मागणी फेटाळत, “उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवरील अपात्रतेसंदर्भात निकाल १५ फेब्रुवारीपर्यंत द्या” असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तर दुसऱ्या बाजूला या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल देण्यात यावा, असे निर्देश नार्वेकरांना द्या, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली होती. यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी, राष्ट्रवादीच्या आमदार पात्र प्रकरणाचा निकाल 15 फेब्रुवारीपर्यंत देण्यात यावा, या निकालासाठी नार्वेकरांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. दरम्यान, नार्वेकरांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता कोर्टाकडे तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. परंतु याला वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी विरोध दर्शवला. यावर मार्ग काढत सुप्रीम कोर्टाने तीनऐवजी फक्त दोन आठवड्यांची मुदत नार्वेकरांना दिली आहे.