हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पांढऱ्या रेशन कार्डधारकांसाठी (White Ration Card) एक आनंदाची बातमी आली आहे. आता ज्या व्यक्तींकडे पांढऱ्या रंगाचे रेशनकार्ड आहे अशा व्यक्तींना देखील महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी रेशन कार्ड आधार कार्डसोबत संलग्न करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यापूर्वी या योजनेचा लाभ फक्त पिवळे व केसरी कार्ड असणाऱ्याच लोकांना घेता येत होता, परंतु आता पांढऱ्या कार्डधारकांना देखील योजनेचा लाभ घेता येणार आहे.
पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना देखील महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी सर्व जिल्हापुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी, सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांना रेशन कार्डला आधारशी जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खरे तर, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०१९ च्या शासन निर्णयान्वये या दोन्ही योजनांना एकत्र आणून त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले होते.
परंतु मधल्या काळात काही नियमांमध्ये बदल करण्यात आले. त्यानुसारच, या दोन्ही योजनांचा लाभ पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड असणाऱ्या लोकांना देखील घेता यावा, असा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु त्याकरता पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड असलेल्या लोकांना रेशन कार्ड आधार क्रमांकाशी संलग्न करणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, इतर रेशन कार्ड बरोबर पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना देखील योजनेचा लाभ घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीचा विचार करूनच सरकारने ही योजना पांढऱ्या रेशन कार्डधारकांसाठी खुली केली आहे.