हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकांनी मला प्रश्न विचारला… सत्ता की साहेब? त्यांचा प्रश्न संपायच्या आत मी उत्तर दिलं साहेब… भर सभेत स्टेजवर हे स्टेटमेंट करणारा कुणी उत्साही कार्यकर्ता नाहीये… तर हे आहेत संदीपभैया… उर्फ संदीप क्षीरसागर… बीडच्या राजकारणात तसा दोनच घराण्यांचा दबदबा राहिला… एक म्हणजे क्षीरसागर घराणं तर दुसरं म्हणजे मुंडे घराणं… पण काळ पुढे सरकत गेला तशा जिल्ह्याच्या राजकारणाच्या चाव्या क्षीरसागर घराण्याकडून मुंडेंकडे गेल्या… आणि मुंडे कुटुंबानं कार्यकर्त्यांच्या, समाजाच्या पाठिंब्यावर असा काही जनाधार मिळवला की बीडमध्ये सब कुछ मुंडे असं सगळेजण बोलू लागले… त्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे बहिण भाऊ एकत्र आल्याने त्यांच्या प्रस्थापित राजकारणाला आणखीनच बळकट हात मिळाले… लोकसभा निवडणूक आली… बीडमधून पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर झाली… अन् त्याच दिवशी त्यांचा विजय झाल्याप्रमाणे जिल्ह्यात जल्लोष झाला… पण या सगळ्यात एका चेहऱ्याचा सगळ्यांना विसर पडला होता… तो म्हणजे संदीप भैया…
राजकारण करायचं तर फांद्या तोडत बसायचं नाही, डायरेक्ट मुळावरच घाव घालायचा… अशी या संदीप क्षीरसागरांच्या राजकारणाची पद्धत… शरद पवार साहेबांना दैवत मानणाऱ्या या पहिल्याच टर्मच्या आमदाराने मनावर घेतलं… आणि पंकजा मुंडेंचा पराभव करत बजरंग बाप्पांसारख्या एका साध्या सुध्या नेत्याला निवडून आणण्यात हुकमी एक्क्याची भूमिका बजावली… नक्की हा संदीप भैय्या आहे कोण? आणि बीडच्या राजकारणात मुंडेंना टक्कर देण्याची हिम्मत त्याच्यात आली कुठून? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…
4 जून ची सायंकाळ… कार्यकर्ते, प्रशासकीय मंडळी आणि स्वतः उमेदवार या सगळ्यांचीच धाकधूक वाढली होती… बीडची मतमोजणी काट्याला काटा लागावा तशी चालली होती… कधी पंकजा मुंडे पुढे जायच्या… तर कधी बजरंग बाप्पांना लीड मिळायची…पण शेवटी निकाल लागला आणि बजरंग बाप्पा जायंट किलर ठरत बीडचे खासदार झाले… पण मतमोजणीच्या वेळी काहीसा गोंधळ झाला… शहरात जामर बसवण्यात आले… हातापायी सुद्धा झाल्याची चर्चा झाली… मुंडेंच्या बाजूने धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते सोबत होते… पण दुसरीकडे बजरंग बाप्पांच्या पाठीशी एकच व्यक्ती उभा होता तो म्हणजे संदीप क्षीरसागर…
यंदाच्या लोकसभेला मुंडे कुटुंबाचा विजय जवळजवळ पक्का मानला जात होता… पंकजा मुंडेंच्या पाठीशी धनंजय मुंडेही सोबत आल्याने आता फक्त लीड मोजायचं, अशा चर्चा होऊ लागल्या… पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार होते बजरंग बाप्पा सोनवणे… अनेक टर्म निवडणूक लढवूनही मुंडे कुटुंबाकडून होणारा सातत्याने पराभव आणि त्यात पक्षफुटीनं राष्ट्रवादीची कमी झालेली ताकद… यामुळे बीडची लोकसभा म्हणजे नुसती फॉरमॅलिटीच होतेय की काय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता… पण एक्स्पिरियंटमध्ये जेव्हा सगळं काही संपत तेव्हा पाठीशी संदीप भैया उभा राहतो…अगदी त्याचप्रमाणे बजरंग बाप्पांच्या पाठीशी शरद पवारांना दैवत मानणारा राजकारणातला संदीप भैया उभा राहतो… बजरंग बाप्पांच्या प्रचाराची सगळी सूत्र संदीप क्षीरसागर हातात घेतात… सभा असोत, वा मतदार संघातील गाठीभेटी…सगळं काही नियोजन क्लिअर कट संदीप क्षीरसागरांच्या हातात असायचं…
मुंडेंसारख्या राजकारणातील प्रस्थापित चेहरे समोर असताना संदीप क्षीरसागरांनी आपणही काही ऐरेगैरे नसून निवडणूक लढवण्याची…आणि ती जिंकून दाखवण्याची…आपल्या धमक असल्याचा इशाराच मुंडेंना दिला होता…त्यामुळेच राष्ट्रवादीत सोबत असताना मांडीला मांडी लावून बसणारे धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर यांनी लोकसभेच्या प्रचारात एकमेकांच्या विरोधात आग ओकली… मुंडे कुटुंबाच्या विरोधात बीडमधून कसलीही भीड न बाळगता बोलण्याची हिंमत दाखवली तीही संदीप क्षीरसागर यांनीच…
बजरंग बाप्पांच्या विजयात मराठा मतं निर्णायक ठरलीच…पण त्यासोबत निकालात सर्वात जास्त प्रभाव टाकला असेल तर तो स्थानिक समीकरणांनी… संदीप क्षीरसागर यांना मानणारा एक मोठा जनसमुदाय जिल्ह्यात आहे…त्यात मुस्लिम समाज आणि दलित समाजाची मतं बजरंग बाप्पांच्या पाठीशी कशी उभी राहतील? याचं फुल टू प्लॅनिंग संदीप क्षीरसागर यांनी केलं होतं…म्हणूनच वंचितचा उमेदवार मैदानात असूनही दलित समाजाची मतं मोठ्या प्रमाणात बजरंग बाप्पांच्या पाठीशी खेचून आणण्यात क्षीरसागरांना यश आलं… मुंडे विरुद्ध क्षीरसागर हा बीड मधला तसा जुना संघर्ष… पण सध्याच्या घडीला राजकारणात एकवटलेल्या मुंडे कुटुंबाला राजकारणात एकट्या पडलेल्या संदीप क्षीरसागरांनी आव्हान दिलं…आणि नुसतं आव्हानच नाही तर लोकसभेला चितपट करत ते पूर्णही करून दाखवलं…
खरंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील धनंजय मुंडेंसोबत अनेक मातब्बर नेत्यांनी अजितदादांची वाट धरली…मुंडे कुटुंबाची…आणि अजितदादांची धास्ती हे त्यामागचं कारण होतं, असं बोललं जातं… पण कुणालाही न घाबरता संदीप क्षीरसागर यांनी मात्र साहेबांसोबतची निष्ठा कायम ठेवली…कुणी कुठेही गेले तरी चालेल, पण मी आयुष्यभर साहेबांच्या सोबतच राहिल… असं खुलं वचन देऊन संदीप भैय्यांनी अप्रत्यक्षपणे अजितदादा आणि धनंजय मुंडे यांना जिल्ह्यातून आव्हान दिलं…नुसतं आव्हान नाही तर खासदारकीला पाणी पाजून जिल्ह्याच्या राजकारणातली आपली ताकदही दाखवून दिलीये…
क्षीरसागर कुटुंबाच्या तीन पिढ्या राजकारणात आहेत. केशरबाई क्षीरसागर या काँग्रेसच्या खासदार होत्या. जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर आणि रवींद्र क्षीरसागर ही त्यांची तीन मुलं…आईसह तिघाही भावांची कारकीर्द आधी काँग्रेसमध्ये गेली आणि नंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर तिघेही राष्ट्रवादीत दाखल झाले. मात्र राष्ट्रवादीत असतानाच या तिन्ही भावांमध्ये विसंवाद सुरू झाला आणि त्याला कारण ठरलं सत्तेतील वाटा…
राष्ट्रवादी काँग्रेसमधलं संदीप क्षीरसागर यांचं वजन वाढल्याने जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत गेले. पण त्यांचे सगळे विरोधक त्यांच्या विरुद्ध एकवटले आणि या सगळ्यांनी संदीपची पाठराखण केली…त्यात 2019 ला आपल्या काकाला चीतपट करत संदीप क्षीरसागर जायंट किलर ठरले… पुढे जयदत्त क्षीरसागरांची शिवसेनेतून हकालपट्टी केली…आणि ते राजकीय अज्ञातवासात गेले…पण संदीप क्षीरसागर यांनी आपल्या घराण्याच्या राजकारणाला जिल्ह्यात चांगलं मजबूत केलं…त्यात राष्ट्रवादीतील फुटीमुळे शरद पवार गटात असणारी नेतृत्वाची पोकळी भरून काढत लोकसभेला त्याचा ट्रेलरही दाखवून दिलाय… येणारी विधानसभा आणि पुढच्या सगळ्याच निवडणुकांना हा संदीप भैय्या मुंडे कुटुंबाला चांगला जड जाणार, ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे… लोकसभा तर आटोपली… आता विधानसभेला जिल्ह्याच्या राजकारणात हा संदीपभैया किती आणि कसा धुडगूस घालतोय…हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…बाकी बीड जिल्ह्याच्या राजकारणात नेमकी ताकद कुणाची जास्त आहे? क्षीरसागर की मुंडे कुटुंबाची? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…