उत्तर कोरेगावमध्ये औद्योगिक वसाहतीच्या मुद्यांवरून समर्थक व विरोधी गट आमनेसामने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर व माण खटावचे आ. जयकुमार गोरे यांच्यामध्ये वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये मुंबई- बंगलोर औद्योगिक वसाहत होण्याच्या मुद्द्यावरून दोन गट निर्माण झाले आहेत. यामध्ये ही औद्योगिक वसाहत व्हावी म्हणून एक समर्थक गट उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये निर्माण झाला आहे. तर ही औद्योगिक वसाहत होऊ नये म्हणून दुसरा विरोधी गट निर्माण झाला आहे. दोन्ही गट सध्या मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहेत.

राज्यातील वरिष्ठ नेतेमंडळी ही या औद्योगिक वसाहतीच्या कलगीतुऱ्यात सहभागी होताना दिसून येत आहेत. उत्तर कोरेगाव तालुक्यामधून औद्योगिक वसाहत समर्थक गटाने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांना औद्योगिक वसाहत व्हावी म्हणून निवेदन दिले आहे. तर दुसरीकडे त्याच पद्धतीने ही मुंबई- बेंगलोर औद्योगिक वसाहत होऊ नये म्हणून एक विरोधी गट स्थापन झाला आहे. या गटाने विविध पक्षाच्या नेतेमंडळींची भेट घेऊन त्यांनाही एमआयडीसी होऊ नये, म्हणून निवेदने देण्यास सुरूवात केली आहे.

विशेषतः पाहिले तर या औद्योगिक वसाहतीवरून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर व माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यामध्ये चांगले शाब्दिक युद्ध रंगल्याचे दिसून येत आहे.  आ. जयकुमार गोरे यांना साथ देण्यासाठी माढा मतदारसंघाचे विद्यमान खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी चांगलीच कंबर कसली आहे. तसे पाहिले तर दोन्ही गट आपापल्या पद्धतीने औद्योगिक वसाहतीची भूमिका मांडताना दिसून येत आहेत. परंतु वरिष्ठ नेते मंडळींचे हे चाललेले खालच्या पातळीवरील वाकयुद्ध सामान्य जनतेला काही पचनी पडताना दिसून येत नाही. सध्या चाललेले वाकयुद्ध अजून किती दिवस चालणार हे पाहणे मात्र औसुक्याचे ठरणार आहे.