Monday, January 30, 2023

साताऱ्यात चाॅकलेट घशात अडकल्याने चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा शहरातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली असून, जेली चॉकलेट घशात अडकल्याने एक वर्षाच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. मुलीच्या आईने चिमुकलीला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच चिमुकलीने आपला जीव सोडला. शर्वरी सुधीर जाधव (रा. कर्मवीरनगर, कोडोली सातारा) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. साताऱ्यातील ही धक्कादायक घटना कर्मवीरनगरामध्ये रविवारी (दि. 25) रात्रीच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चिमुकल्या शर्वरीला तिच्या शेजारी राहणाऱ्या एका लहान मुलीने जेली चॉकलेट खाण्यास दिले. हे चॉकलेट तिने स्वत: गिळले. परंतु चॉकलेट तिच्या घशात अडकल्याने ती खोकू लागली. यानंतर ती बेशुद्ध पडली. तिच्या आईच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी घराशेजारी राहणारे देवबा जाधव यांना बोलावून घेतले. त्यांनी तातडीने शर्वरीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

- Advertisement -

डॉक्टरांनी तिला तपासले असता ती मृत झाल्याचे समजले. चिमुलकलीच्या घशात चॉकलेट अडकून मृत्यू झाल्याने तिच्या आईने आक्रोश केला. या मातेचा आक्रोश अक्षरश: काळीज पिळवटून टाकणारा होता. सातारा शहर पोलिस ठाण्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे.