औरंगाबाद । तिची मला समजून घेण्याची तयारी नाही, त्याला/तीला मोबाईलमधुन वेळच मिळत नाही. तो/तीच्या माहेरची/सासरची माणसे मिळुन माझा छळ करतात. तिच्या/त्याच्या जाचाला मी आता कंटाळले आहे. बायको/नवरा विरूद्धच्या अशा अनेक तक्रारी घेऊन कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्यांना तडजोडीचा एक आशेचा किरण म्हणजे कौटुंबिक न्यायालयातील राष्ट्रीय लोकअदालत होय. आज औरंगाबाद येथील कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. या लोकअदालतीत तब्ब्ल 30 प्रकरणांची तडजोड होऊन प्रकरणे निकाली निघाली.
आजच्या कोरोना काळात व समाजात कौटुंबिक हिंसाचार वाढत असलेल्या परिस्थितीत कौटुंबिक न्यायालय यांनी अथक परिश्रम घेऊन 25 जोडप्यांची संसार जुळविण्यात यश मिळवले आहे. हि अत्यंत अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे. आज एकुण 43 प्रकरणे आली होती. त्यात दोन्ही बाजुची 30 जोडपी हजर राहीली व एकुण 30 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. आज झालेल्या लोकअदालतीमध्ये मैत्री दिनाचे औचित्य साधून 25 प्रकणांमधील जोडपी आनंदाने पुन्हा एकत्र नांदण्यास गेली. तसेच 5 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली 13 प्रकरणांमध्ये उभय पक्षकार गैरहजर राहिले.
याप्रसंगी पॅनल क्र. 1 यावर न्यायाधीश आशिष आयाचित यांनी पॅनल प्रमुख म्हणुन तर विधिज्ञ श्रीमती अमृता परांजपे व समुपदेशक श्रीमती रश्मी देशपांडे यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले, तर पॅनल क्र. 2 यावर निवृत्त न्यायाधीश टी.बी. जाधव यांनी पॅनल प्रमुख म्हणुन तर विधिज्ञ संतोष पाथ्रीकर व समुपदेशक श्रीमती मनिषा कांदे यांनी पॅनल सदस्य म्हणुन काम पाहिले.
राष्ट्रीय लोकअदालत प्रमुख न्यायाधीश श्रीमती आय.जे.नंदा यांचे अध्यक्षतेखाली पार पडली व कौटुंबिक न्यायालयातील विवाह समुपदेशक भरत काळे व श्रीमती ज्योती सपकाळे तसेच श्रीमती वंदना कोचर, न्यायालयीन व्यवस्थापीका श्रीमती एम.आर.दाणी, प्रभारी प्रबंधक व कौटुंबिक न्यायालयातील कर्मचारी यांनी लोकअदालतीसाठी विशेष परिश्रम घेतले.