पुणे मेट्रोला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अशातच स्वारगेट ते शिवाजीनगर या नव्याने सुरू झालेल्या मेट्रोला देखील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळालेला दिसतो आहे. याबाबतची आकडेवारी आता समोर आली असून सप्टेंबर मध्ये एकूण प्रवासी संख्या 46 लाख 19 हजार इतकी नोंदवली गेली आहे. चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती…
47 लाख प्रवाशांनी केला प्रवास
खरंतर पुण्यामध्ये मेट्रो सुरु झाल्यापासून पीएमपी ला होणारी गर्दी ही मेट्रो कडे विभागली गेलेली आहे त्यामुळे ट्रॅफिक मध्ये तासंतास अडकून राहणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट 2024 मध्ये प्रवासी संख्या एक लाख 18 हजार पेक्षा जास्त होते तर सप्टेंबर 2024 मध्ये दैनंदिन प्रवासी संख्या मध्ये 25 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झालेली दिसून येत आहे. सप्टेंबर मध्ये दैनंदिन प्रवासी संख्या एक लाख 53 हजार 91 नोंदवण्यात आली आहे तर सप्टेंबर मध्ये एकूण प्रवासी संख्या 46 लाख 19 हजार 130 इतकी नोंदवण्यात आली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये पुणे मेट्रोला ७ कोटी सहा लाखांचं उत्पन्न मिळालं आहे. दैनंदिन सरासरी उत्पन्न 23 लाख 56 हजार इतके आहे. तर सप्टेंबर महिन्याची आकडेवारीवर नजर टाकल्यास एकूण प्रवासी संख्येची विभागणी केली असता पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गावर 35 टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी संख्या तर रामवाडी ते वनाज या मार्गावर 65 टक्के प्रवासी संख्या निदर्शनास आली आहे.
महामेट्रोला 7 कोटींचा महसूल
पीसीएमसी ते स्वारगेट मार्गावर 15 लाख 74 हजार 340 प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्या माध्यमातून मेट्रोला 2 कोटी 30 लाख 35 हजार 152 रुपयांचा महसूल मिळालाय तर रामवाडी वनाज मार्गावर तीस लाख 49 हजार 790 प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्या माध्यमातून मेट्रोला चार कोटी 76 लाख 60 हजार 281 रुपयांचा महसूल प्राप्त झालाय. या दोन्ही मार्गांचा विचार केला एकूण 46 लाख 19 हजार 130 प्रवाशांनी प्रवास केला असून महा मेट्रोला यातून सात कोटी सहा लाख 95 हजारांचा महसूल प्राप्त झालाय.
सर्वात जास्त प्रवासी संख्या असलेली पाच मेट्रो स्थानके
पीसीएमसी 5 लाख 85 हजार 753 इतकी प्रवासी संख्या, पीएमसी 4 लाख 68 हजार 915 इतकी प्रवासी संख्या, रामवाडी तीन लाख 99 हजार 779 प्रवासी संख्या, पुणे स्टेशन तीन लाख 43 हजार 724 प्रवासी संख्या, आणि शेवटचा आणि पाचवा स्थानक म्हणजे वनात दोन लाख 79 हजार 44 प्रवासी संख्या.