मराठा आरक्षणाच्या नावाखाली बापानेच रचला मुलीच्या हत्येचा कट; एका घटनेमुळे राज्यात खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याच गोष्टीचा फायदा घेत एका बापाने आपल्या मुलीच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. मराठा आरक्षणाच्या नावाखाली मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न बापाने केला होता. परंतु शेवटच्या क्षणाला त्याचा हा कट फसला. तसेच, मुलीच्या जीवाचे बरे वाईट करण्यास बापाला अपयश आले. त्यामुळे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे.

नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजी नगर येथील स्वास्तिकनगर वडगाव कोल्हाटी येथे एका बापाने आपल्या मुलीच्या हत्येचा कट रचला होता. मुख्य म्हणजे, या बापाने मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्याकडून सुसाईड नोट लिहून घेतली होती. या सुसाईड नोटमध्ये मी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहण्यात आले होते. तसेच, या सुसाईड नोटवर तिची सही व अंगठा देखील घेतला होता. परंतु आपल्या सोबत घडत असलेल्या प्रकार मुलीच्या लक्षात आल्यानंतर तिने लगेच आपल्या प्रियकराला इन्‍स्‍टाग्रामवर मेसेज पाठवला. यानंतर मुलीच्या प्रियकराने तातडीने सिडको पोलीस ठाण्यात धाव घेत मुलीच्या कुटुंबियांविरोधात तक्रार नोंद केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी 5 ऑक्‍टोबर पासून आपल्या प्रियकरासोबत लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. परंतु या दोघांचे हे संबंध घरच्यांना मान्य नव्हते. त्यामुळे 5 नोव्हेंबर रोजी मुलीच्या घरच्यांनी तिच्या प्रियकराला बेदम मारहाण करून मुलीला घरी आणले. तसेच तिचा फोन जप्त करून तिला डांबून ठेवले. याकाळात त्यांनी मुलीकडून एक सुसाईट नोट लिहून घेतली, ज्यामध्ये “आरक्षण नसल्याने शिक्षणापासून वंचित राहत असून, त्यामुळे शिकू शकत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत असून, कोणालाही जबाबदार धरू नये” असा मजकूर लिहिण्यात आला.

घरच्यांची ही विकृत वृत्ती पाहून मुलीला भीती वाटू लागली. तसेच आपल्या इज्जतीसाठी वडील आपल्या जीवाचे बरे वाईट करू शकतात हे देखील तिच्या लक्षात आले. शेवटी तिने 20 नोव्हेंबर रोजी कुटुंबातील एका मोबाइलवरून आपल्या प्रियकराला मेसेज केला आणि मदत मागितले. यानंतर प्रियकराने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली. दरम्यान, ही बाब उघडकीस आल्यानंतर मुलीने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितला आहे. तसेच, वडिलांनी लिहून घेतलेली चिट्ठी पोलिसांच्या हवाली केली आहे. सध्या ही मुलगी शासकीय आधारगृहात राहत आहे. मात्र तीचे आपल्या प्रियकरावर प्रेम असल्यामुळे तिला त्याच्या सोबतच राहीचे असल्याचे तिने पोलिसांना स्पष्ट सांगितले आहे.