जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
जिल्हा परिषदे अंतर्गत तब्बल 10 वर्षांनंतर वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा स्पर्धेत व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन ताण-तणाव विसरुन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आनंद घ्यावा व आपल्या कला गुणांना वाव द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले.

येथील पोलीस कवायत मैदानावर जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे 10 ते 12 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन विविध सांस्कृतिक कार्यक्रम व गझी नृत्य व लेझीम ढोल-ताशांच्या गजरात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उत्साह पाहून आनंद होत असल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी म्हणाले, प्रत्येक पंचायत समितींचे संघ या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात सहभागी झाले आहेत. या स्पर्धेमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कला गुणांना वाव मिळणार आहे. खेळाडूंनी खिलाडीवृत्तीने सर्व नियम पाळून खेळाचे प्रदर्शन करावे. प्रत्येक वर्षी वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. या पुढील काळातही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सातारा जिल्हा परिषदेचा आणखीन नावलौकीक कसा वाढेल यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही श्री. खिलारी यांनी यावेळी केले.

क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सांस्कृतिक व विविध योजनांचा जागर
जिल्हा परिषद अंतर्गत वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे 10 ते 12 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मिशन धाराऊ, मिशन जिजाऊ यासह जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जागर व ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असणारा सातारा जिल्हा या विषयी चित्ररथ तयार केले होते. हे चित्ररथ आणि सांस्कृतिक कार्यक्रम उपस्थितांचे आकर्षण ठरले. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पोवई नाका येथून आलेल्या क्रीडा ज्योतीचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यानंतर सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट संचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली. यानंतर उपस्थितांना श्री. खिलारी यांनी क्रीडा शपथ दिली.