दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने प्रमुख रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला.
गव्हाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 2,275 रुपयांवरून 2,425 रुपये करण्यात आली आहे. तसेच मोहरीच्या दरात 300 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचा एमएसपी आता 5,950 रुपये प्रति क्विंटल झाली आहे. हरभऱ्यासाठी एमएसपी 210 रुपयांनी वाढवून 5,650 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे आणि विशेषत: आगामी रब्बी हंगामात शेतीच्या उत्पन्नाला आधार देणे हे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विपणन वर्ष 2025-26 साठी सर्व रब्बी पिकांसाठी ही वाढ करण्यात आली आहे. मसूरच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 275 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. करडईच्या एमएसपीमध्ये 140 रुपये प्रति क्विंटल आणि बार्लीच्या एमएसपीमध्ये 130 रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे.