IND Vs ENG Test : दुसऱ्या कसोटीत भारताचा 106 धावांनी विजय; मालिकेत 1-1 बरोबरी

IND Vs ENG Test result
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IND Vs ENG Test : इंग्लडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने 106 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. आजच्या चौथ्या दिवशीच इंग्लडच्या संघाला ऑल आऊट करत भारताने विशाखापट्टणन कसोटी आपल्या खिशात घातली. भारतीय फिरकीपटू आणि तेज गोलंदाजी समोर इंग्लडच्या फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले आणि भारताने अतिशय गरजेचा असा विजय मिळवला. पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ३ असे एकूण ९ बळी घेतलेला तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्याचा मानकरी ठरला. या विजयानंतर एकूण ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी साधली आहे.

सामन्याच्या चौथ्या डावात इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य होते, त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लडचा डाव 292 धावांवर आटोपला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 396 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव 253 धावांवर आटोपला. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात 255 धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 399 धावांची आवश्यकता होती. परंतु 292 मध्येच इंग्लंडचा संघ ढेर झाला. इंग्लंडकडून (IND Vs ENG Test) झॅक क्रोवलेने सर्वाधिक ७३ धावा केल्या. त्याखालोखाल बेन फॉक्स आणि टॉम हार्टली यांनी प्रत्येकी ३६ धावा केल्या. बाकी फलंदाज जास्त काळ मैदानावर तग धरू शकले नाही.

अश्विन- बुमराहची टिच्चून गोलंदाजी – IND Vs ENG Test

दुसरीकडे भारतीय संघाकडून फिरकपटू आर अश्विन आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या मुकेश कुमारने प्रत्येकी १ बळी घेतला. आर अश्विनने या सामन्यात एक मोठा विक्रम केला आहे. इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा अश्विन पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने इंग्लंड विरुद्व ९७ बळी घेतले आहेत. यावेळी अश्विनने बीएस चंद्रशेखर, बीएस बेदी, कपिल देव आणि अनिल कुंबळे याना मागे टाकलं.