मोदींच्या हनुमानाला INDIA आघाडीची ऑफर; भाजपला मोठा झटका बसणार??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्ष जागावाटपाबाबत चर्चा करत असताना आता बिहारच्या आणि देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांना इंडिया आघाडीने (INDIA Alliance) ऑफर दिली आहे. सध्या लोजप मध्ये चिराग पासवान आणि त्यांचे काका पशुपती पारस यांच्यात वाद आहे. त्यामुळे या राजकीय परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी इंडिया आघाडी चिराग पासवान याना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी चिराग पासवान यांच्या पक्षाला बिहारमध्ये 8 आणि यूपीमध्ये 2 जागांची ऑफर दिल्याचीही चर्चा आहे.

चिराग पासवान आणि त्यांचे काका पशुपती पारस हे आपापल्या पक्षांना खरी LJP (लोकजन शक्ती पार्टी) म्हणत आहेत. पारस हे सिटिंग गेटिंग फॉर्म्युलावर जागा मागत असल्याचे बोलले जात आहे. तर चिराग पासवान स्वतःला रामविलास पासवान यांच्या व्होटबँकेचा खरा वारसदार सांगून जागांची मागणी करत आहेत. NDA मध्ये चिराग पासवान आणि पशुपति पारस यांना एकूण ६ जागा देण्याची चर्चा आहे. परंतु दोघेही त्यासाठी तयार नाहीत. चिराग पासवाग यांनी २०१९ च्या फॉर्म्यल्याप्रमाणे लोक जनशक्ती पार्टी ६ खासदार जिंकले होते. त्यानुसारच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ६ जागांची मागणी केली आहे. तर दुसरीकडे पशुपति पारस यांनी ६ पैकी ५ खासदार माझ्यासोबत आहेत त्यामुळे आम्हाला ६ जागा पाहिजेत असं म्हटलं आहे.

मागील महिन्यात नितीशकुमार हे पुन्हा एकदा भाजपसोबत गेल्यामुळे चिराग पासवान अस्वस्थ असल्याच्या चर्चा आहेत. अशावेळी राजकीय परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीने चिराग पासवान याना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यासाठी बिहारमध्ये चिराग पासवान यांना लोकसभेच्या आठ जागा आणि उत्तर प्रदेशात लोकसभेच्या दोन जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. चिराग पासवान आता यावर काय निर्णय घेणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र NDA मध्ये मनासारख्या गोष्टी झाल्या नाही तर मात्र ते इंडिया आघाडीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजद नेते तेजस्वी यादव यांनीही चिराग पासवान यांच्यासाठी महाआघाडीचे दरवाजे उघडले असून ज्यांना महाआघाडीत सामील व्हायचे आहे की नाही याबाबत त्यांनी निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.