भारत- श्रीलंका प्रवासी फेरी सेवा सुरू; कनेक्टिव्हिटी वाढवण्यास होणार मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | श्रीलंका (Sri Lanka) हा आपला मित्र राष्ट्र आहे. इतिहासात दोन्ही देश एकमेकांना रामसेतूच्या माध्यमातून जोडले गेलेले होते. परंतु सध्या तसा कुठलाही पूल अस्तित्वात नाही. मात्र भारत आणि श्रीलंका यांना जोडण्याकरिता आता भारत  सरकारच्या माध्यमातून समुद्रमार्गे फेरी सुविधा (India-Sri Lanka Ferry Service) 14 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आली आहे. फेरीद्वारे भारत आणि श्रीलंकेतील लोक एकमेकांच्या देशात सहज प्रवास करू शकतील .

सर्बानंद सोनोवाल यांनी दाखवला हिरवा झेंडा : 

तामिळनाडू राज्यातून 14 ऑक्टोबर भारत ते श्रीलंका या फेरी सुविधेला सुरुवात करण्यात आली आहे. ही फेरी सुविधा तामिळनाडू मधील  नागापट्टीनम येथून  सुरु होऊन उत्तर श्रीलंकेतील जाफना जिल्ह्यात असलेल्या कानकेसंथुराई यादरम्यान सुरु करण्यात आली आहे. देशाचे नौकानयन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दोन्ही देशादरम्यान सुरु करण्यात आलेल्या फेरी सुविधेला हिरवा झेंडा दाखवला . याप्रसंगी तामिळनाडू राज्याचे सार्वजनिक बांधकाम, रस्ते व बंदरे विकास मंत्री इ. वी. वेलू हे देखील उपस्थित होते.

110 किमी अंतर 3.5 तासात होणार पार :

सदरील फेरी सुविधा दोन्ही देशांना जोडणार असून एकूण 110 km एवढे अंतर अवघ्या साडेतीन तासात पुर्ण करणार आहे. त्यामुळे भारत  आणि श्रीलंकामधील प्रवासाकरिता स्वस्त आणि उत्तम पर्याय उपलब्ध  होणार आहे. तसेच या सुविधेमुळे या भागात पर्यटन व व्यवसाय वृद्धीस मदत मिळणार आहे. याशिवाय दोन्ही देशाचे राजनीतिक संबंध अधिक मजबूत होण्यास मदत मिळणार आहे.

भारत आणि श्रीलंका राजनैतिक आणि आर्थिक संबंधांमध्ये नवीन अध्याय सुरू:

भारत आणि श्रीलंका दरम्यान सुरु करण्यात आलेल्या फेरीच्या उदघाटन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेल्या व्हिडिओ संदेशातून मोदी यांनी सांगितले  की,” भारत आणि श्रीलंका राजनैतिक आणि आर्थिक संबंधांमध्ये नवीन अध्याय सुरू करत आहेत आणि नागापट्टिनम आणि कानकेसंथुराई दरम्यान फेरी सेवेचा शुभारंभ हा संबंध मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.”