तिसऱ्याच दिवशी इंग्रजांचा सुफडा साफ; भारताने 4-1 ने मालिका जिंकली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धर्मशाळा येथील इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि ६४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. बेझबॉल क्रिकेटचा इशारा देणाऱ्या इंग्रजाला टीम इंडियाने तिसऱ्याच दिवशी अस्मान दाखवलं. भारतीय फिरकीपटूंच्या समोर पुन्हा एकदा इंग्लिश फलंदाजी ढेपाळली. या कसोटीसह ५ कसोटी सामन्यांची मालिका भारताने ४-१ ने जिंकली. कुलदीप यादव सामनावीर तर सलामीवीर यशस्वी जयस्वाल मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला.

पहिल्या डावात भारताने २५९ धावांची आघाडी घेतली. रोहित शर्मा- शुभमन गिलने दमदार शतके करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. याशिवाय, यशस्वी जयस्वाल, सर्फराज खान आणि देवदत्त पड्डीकल यांनी अर्धशतके ठोकली. भारताचा डाव ४७७ आटोपला. भारताला २५९ धावांची आघाडी मिळाल्यानंतर फलंदाजीला उतरलेला इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात सुद्धा ढेपाळला. दुसऱ्या डावात इंग्लंडचा १९५ धावांत खुर्दा झाला. अश्विन- कुलदीप या फिरकीपटूंपुढे इंग्लंडचा संघ पुरता ढेर झाला.

भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आपली 100 वी कसोटी खेळताना या सामन्यात 9 विकेट घेतल्या. गेल्या 12 वर्षांत घरच्या मैदानावर भारताचा हा सलग 17 वा मालिका विजय आहे. मायदेशात सलग सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर आहे. तर सलग 10 मालिका जिंकून ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कसोटीत 0-1 अशा पिछाडीनंतर भारतीय संघाने 7व्यांदा मालिका जिंकली आहे.