सोलापूर प्रतिनिधी । भारतीय सैन्यदलात सख्या भावाची भरती झाल्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील तोगराळी येथील नागनाथ जमादार या सैनिकाने तोगराळी ते पंढरपूर असे ९० किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण केले. त्यानंतर त्यानी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. पंडित शंकर जमादार यांचा मुलगा नागनाथ जमादार हा सैन्यामध्ये उदमपूर,जम्मू काश्मिर येथे गेले चार वर्षांपासून कार्यरत आहे. दरम्यान त्याचा भाऊ नवनाथ जमादार हा देखील सैन्यमध्ये भरती झाला आहे. सध्या नवनाथ हा बेंगलोर येथे ट्रेनिंग घेत आहे. नागनाथ जमादार यांनी ”आपला भाऊ नवनाथ देखील आपल्या बरोबर सैन्यामध्ये भरती होईल तेव्हा आपण धावत विठ्ठलच्या दर्शनासाठी जावू” असा पण केला होता.
आपला पण पूर्ण करण्यासाठी नागनाथ यांनी आपल्या राहत्या तोगराळी या गावातून पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी धावत प्रवासाची सुरुवात केली.नागनाथ यांनी तोगराळी ,दक्षिण सोलापूर ते पंढरपूर असा ९० कि.मी.चा कोठेही न थांबता अखंडपणे धावत होता.हे संपूर्ण अंतर त्यांनी १२ तासात पूर्ण केले. या प्रवासात त्याच्यासोबत त्यांचे वडिल पंडित जमादार हे टू व्हीलर प्रवास करत होते. पंडित जमादार हे वारकरी आहेत. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त असून पंढरीच्या चारीही यात्रा ते नियमित करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.सध्या नागनाथ जमादार या सैनिकाच्या आगळयावेगळया विठ्ठल भक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.