15 महिन्यांत 3 ICC ट्रॉफी; टीम इंडियाला नवा इतिहास रचण्याची संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लड विरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. यानंतर देशात IPL स्पर्धा खेळवण्यात येईल. आयपीएलनंतर लगेचच टी-20 विश्वचषक 2024 चे आयोजन केले आहे. त्यामुळे खेळाडूंना एखाद्या मशीन सारखं काम करावं लागणार आहे. तसे पाहिले तर पुढील १५ महिने भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. या १५ महिन्यांत आयसीसीच्या 3 मोठ्या स्पर्धा होणार आहेत. या तिन्ही स्पर्धा जिंकून एक नवा इतिहास रचण्याची संधी भारतीय संघाला आणि कर्णधार रोहित शर्माला असेल.

T20 विश्वचषक स्पर्धा –

भारतीय संघाला पहिले आव्हान असणार आहे ते म्हणजे T20 विश्वचषक स्पर्धा. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेने या स्पर्धेचं यजमानपद घेतलं असून 1 जून ते 29 जून दरम्यान हा वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. भारतासह एकूण २० संघ या स्पर्धेत भाग घेत आहेत. या स्पर्धेसाठी एकूण ४ गटात संघांची विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटात ५ संघांचा समावेश आहे. भारताच्या गटात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, यजमान अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंडचा समावेश आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. दुसरा सामना ९ जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे. साखळी फेरीतील सामने जिंकून भारताला आधी सुपर-6 मध्ये प्रवेश करावा लागेल. नंतर सेमी फायनल आणि फायलन मध्ये धडक मारून वर्ल्डकप आपल्या नावावर करावा लागेल. २००७ मध्ये पहिलावहिला T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर अजूनही भारत दुसऱ्यांदा हा चषक आपल्या नावावर करू शकला नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफी-

यानंतर पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात येईल. खरं तर 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला मिळालं आहे, मात्र हि स्पर्धा पाकिस्तानात खेळवलीच जाईल कि नाही याबाबत आद्यद स्पष्टता नाही. याशिवाय भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जातो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यापूर्वी आशिया चषक 2023 स्पर्धेत यजमानपद पाकिस्तानला मिळालं होते. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानात जायला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर हायब्रीड मॉडेल अंतर्गत ही स्पर्धा आयोजित केली आणि भारताने आपले सामने श्रीलंकेत खेळले. आताही मग असच होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने दोनदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. आता तिसऱ्यांदा जेतेपद पटकावून इतिहास रचण्याचा रोहित सेनेचा मानस असेल.

WTC फायनल –

त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना जून 2025 मध्ये इंग्लडच्या भूमीवर होणार आहे. क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर हा अंतिम सामना होणार आहे. भारतीय संघाने यापूर्वी 2021 आणि 2023 च्या WTC फायनल मध्ये धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेस भारताच्या पदरी पराभव आला आणि क्रिकेटप्रेमींची घोर निराशा झाली. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा भारतीय संघ अंतिम फेरी गाठतो का? आणि WTC जिंकून इतिहास रचतो का ते पाहावं लागेल.