Indian Railway : भारतामध्ये रेल्वेचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ही केवळ एक वाहतूक सेवा नसून, देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक मानली जाते. रेल्वेमुळे ग्रामीण व शहरी भागांमधील दरी कमी झाली असून, लोकांचा परस्पर संपर्क अधिक सुलभ झाला आहे. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार आणि सामान्य नागरिक यांच्यासाठी रेल्वे हा प्रवासाचा किफायतशीर आणि विश्वासार्ह पर्याय आहे. लाखो लोकांचा रोजगार या यंत्रणेशी जोडलेला आहे. मालवाहतूक क्षेत्रातही रेल्वेचा (Indian Railway) मोठा वाटा असून, देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे भारताच्या विकासात रेल्वे ही एक महत्त्वाची जीवनवाहिनी ठरली आहे.
आता रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांचा प्रवास आणखी सोयीस्कर करण्यासाठी लवकरच एक नवीन एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. या एक्सप्रेस ट्रेनला राज्यातील दहा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या नवीन एक्सप्रेस गाडीचा मार्ग हा बल्हारशाहपासून सुरू होऊन चंद्रपूर, वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव आणि शेवटी नंदुरबार या प्रमुख स्थानकांपर्यंत असेल. या गाडीमुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाची शहरे थेट रेल्वे मार्गाने जोडली जातील. हे स्थानक प्रवाशांच्या दैनंदिन हालचालीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
या गाडीच्या (Indian Railway) सुरुवातीनंतर स्थानिक उद्योग, शिक्षण संस्था, नोकरी करणारे कर्मचारी, तसेच वैद्यकीय उपचारासाठी प्रवास करणारे नागरिक यांच्यासाठी प्रवास अधिक सुलभ व जलद होणार आहे. विशेषतः ज्या भागांमध्ये थेट रेल्वे सेवा कमी होती, तिथे आता ही सेवा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
रेल्वे प्रशासनाने अजून या गाडीच्या सुरुवातीची नेमकी तारीख, वेळापत्रक आणि नाव जाहीर केलेले नसले तरी, लवकरच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. या गाडीमुळे स्थानिक पर्यटन, व्यापार आणि सामाजिक-सांस्कृतिक संबंधांनाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी ही एक महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्ह पाऊल ठरणार आहे.