माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कटरा ते श्रीनगर दरम्यानची नवी रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार आहे. आता कटरा ते श्रीनगरचा प्रवास ट्रेनने सहज करता येणार आहे. भारतीय रेल्वेने या मार्गावर सुरुवातीला कटरा ते श्रीनगर दरम्यान ट्रेन चालवण्याची योजना आखली असून, लवकरच जम्मू आणि दिल्लीहूनही थेट गाड्या सुरू होतील.
रेल्वे मंत्रालयाची तयारी अंतिम टप्प्यात
रेल्वे मंत्रालयानुसार कटरा ते संगलदान दरम्यानची रेल्वे लाईन पूर्णपणे तयार करण्यात आली आहे. या मार्गावर टी-33 बोगदा तयार करण्यात आला असून, हा सर्वात मोठा आणि आव्हानात्मक प्रकल्प होता. कमिश्नर ऑफ रेल्वे सेफ्टी (CRS) यांच्याकडून या मार्गाची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस या मार्गाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे आणि ट्रेन सेवा सुरू होईल.
कश्मीर रेल्वे मार्ग संपूर्ण भारताशी जोडला जाणार
भारतीय रेल्वेने काश्मीरला भारताच्या मुख्य रेल्वे नेटवर्कशी जोडण्यासाठी 272 किमी लांबीच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्ग (USBRL) चे बांधकाम पूर्ण केले आहे. हा प्रकल्प 2002 मध्ये ‘राष्ट्रीय प्रकल्प’ म्हणून घोषित करण्यात आला होता आणि हा स्वातंत्र्यानंतर भारतीय रेल्वेसाठी सर्वात मोठे आव्हानात्मक काम मानले जाते.
ट्रेन वाहतूक कशी असेल?
कटरा ते संगलदान (17 किमी) दरम्यानचा रेल्वे मार्ग पूर्ण
कन्याकुमारीपासून कटरा आणि बारामुल्ला ते संगलदानदरम्यान आधीच ट्रेन सेवा सुरू
कटरा ते संगलदान दरम्यान रेल्वे सुरू झाल्यावर संपूर्ण काश्मीर कन्याकुमारीशी जोडले जाणार
लवकरच वैष्णो देवी आणि काश्मीरला थेट ट्रेनने भेट देता येणार
नवीन रेल्वे लाईनमुळे देशभरातील भाविक माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी आणि श्रीनगरला थेट ट्रेनने प्रवास करू शकतील. त्यामुळे रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होणार आहे. रेल्वे मंत्रालय लवकरच याचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करणार आहे.