हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत- पाकिस्तान बॉर्डर (India- Pakistan Border) वरून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतातून चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला जवान पुनः एकदा स्वगृही भारतात परतला आहे. पूर्णम कुमार शॉ (BSF jawan Purnam Shaw) असं सदर जवानांचे नाव असून ते भारतीय सुरक्षा दलाचे कॉन्स्टेबल आहेत. अटारी बॉर्डरवर पाकिस्तानने जवान पूर्णम कुमार शॉ यांना भारताच्या ताब्यात सुपूर्द केलं आहे. 23 एप्रिल 2025 पासून ते पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात होते. पीके शॉ यांना 10.30 वाजण्याच्या सुमारास संयुक्त चेक पोस्ट अटारीवरुन भारताकडे सोपवण्यात आलं आहे.
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पूर्णम कुमार शॉ हे बॉर्डरवर तैनात होते. फिरोजपूर येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ ते गस्त घालत त्यावेळी चुकून ते पाकिस्तानच्या हद्दीत गेले. नो मॅन्स लॅण्ड म्हणजेच दोन्हीकडील कोणत्याही अधिकारी किंवा सैनिकांना प्रवेशाची परवानगी नसलेल्या भागात गेलेल्या पी. के. सिंग यांना पाकिस्तानी रेंजर्सने ताब्यात घेतलं होतं. पुरनम कुमार यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना पाकिस्तानी रेंजर्सने बंधकाप्रमाणे ठेवल्याचे फोटो समोर आले होते. मागील २० दिवस ते पाकिस्तानच्या ताब्यात होते. अखेर आज सीमेवर शांतता प्रस्थापित झाल्यावर शॉ यांना पाकिस्तानने भारतात परत पाठवलं आहे.
खरं तर ज्यादिवशी पूर्णम कुमार शॉ याना पाकिस्तानने ताब्यात घेतलं होते, त्या दिवसापासूनच त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी दोन्ही देशांच्या सीमा दलांमध्ये संवाद सुरु होता. एखाद्या सैनिकाने चुकून सीमा ओलांडून जाणं ही सामान्य बाब आहे यापूर्वीही दोन्ही बाजूने असं घडलं असून अनेकदा अशा सैनिकांना मायदेशी परत पाठवलं जातं, असं अधिकाऱ्यांनी नमूद केलं होतं. मात्र आता पहलगाम प्रकरणानंतर दोन्ही देशांमधील संबंध तापलेले असल्याने पीके सिंग यांची सुटका कधी होते याबाबत साशंकता होती. परंतु अखेर पूर्णम कुमार शॉ भारतात परतले आहेत. दुसरीकडे, भारतानेही पाकिस्तानच्या एका जवानाला पाकिस्तानात परत पाठवलं आहे. बीएसएफने राजस्थानात भारतीय सीमेजवळ श्रीगंगानगर येथे एका पाकिस्तानी रेंजरला अटक केली होती. मात्र भारतीय जवानाच्या बदल्यात भारताने सुद्धा पाक रेंजरला पाकिस्तानकडे सुपूर्द केलं आहे.




