Indigo विमानात प्रवाशाने पायलटच्या थोबाडीत मारली; धक्कादायक Video Viral

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध विमान कंपनी Indigo च्या फ्लाईट मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. विमानाला उशीर झाल्यामुळे संतप्त झालेल्या एका प्रवाशाने थेट वैमानिकाच्या थोबाडीत मारली आहे. याबाबतचा विडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरं तर विमानाला उशीर झाल्याची माहिती सदर पायलट देत असतानाच त्याच्यावर हा हल्ला झाला. साहिल कटारिया असे आरोपी प्रवाशाचे नाव असून त्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

याबाबत अधिक माहिती अशी कि, दिल्लीहून गोव्याला जाणारे इंडिगो फ्लाईटला (6E-2175) धुक्यामुळे तब्बल १३ तास उशीर झाला. मात्र यामुळे भर कडाक्याच्या थंडीत प्रवाशांची बरीच गैरसोय झाली. यानंतर विमानाचा पायलट विमानाला उशीर झाल्याची माहिती प्रवाशांना देत ​​होता. त्याचवेळी पाठीमागे बसलेला एक प्रवाशी धावत पळत आला आणि थेट वैमानिकाच्या कानशिलात मारली. फ्लाइट टेक ऑफ करणार नसेल तर गेट तरी उघडा असे सांगत आरोपी प्रवाशाने चांगलाच गोंधळ घातला. एअर होस्टेसने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

या प्रकारानंतर पोलिसांनी सदर आरोपी साहिल कटारियावर कारवाई केली. इंडिगो फ्लाइटचे सह-वैमानिक अनूप कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून आयपीसीच्या कलम ३२३, ३४१, २९० आणि २२ विमान नियमांनुसार पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. परंतु या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. अनेक यूजर्सनी व्हायरल झालेल्या विडिओ वर जोरदार कॉमेंट्स करत वैमानिकाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. “वैमानिकांचा किंवा केबिन क्रूचा उशीर होण्याशी काय संबंध? ते फक्त त्यांचे काम करत होते. त्यामुळे या व्यक्तीला अटक करा, आणि त्याला नो- फ्लाय लिस्टमध्ये टाका,” असे एका यूजर्सने म्हंटल.