हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indrayani River Bridge Collapse। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर ५० हुन अधिक पर्यटन जखमी झाल्याचं बोललं जातंय. अजूनही काही जणांचे शोधकार्य सुरु आहे. ज्यावेळी हा पूल कोसळला त्यावेळी पुलावर पर्यटकांची मोठी गर्दी होती असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं होते. त्यानंतर आज पूल कोसळण्यापूर्वीचा थरारक फोटो समोर आला आहे. या फोटोवरूनच तूम्हाला अंदाज येईल कि या पुलावर नेमका किती भार पडला असेल.
फोटोत नेमकं काय आहे? Indrayani River Bridge Collapse
पूल नदीत कोसळण्याच्या काही क्षण आधीचा फोटो पाहून तुमचंही मन हादरेल. या फोटोत तुम्ही बघू शकता कि इंद्रायणी नदीवरील पूल हा प्रवाशांनी अतिशय खचाखच भरला आहे. अगदी मुंगीलाही जायला वाट नाही असं हे चित्र आहे. ज्यावेळी हा पूल मध्यभागी खचला आणि खाली कोसळला त्यावेळी त्यावर शंभरहून अधिक लोक असल्याचे या फोटोच्या माध्यमातून दिसत आहे. पूल खाली कोसळताना (Indrayani River Bridge Collapse) त्यावर उभे असलेले लोक आहेत त्या स्थितीमध्ये नदीच्या पात्रात पडल्याचं फोटोवरुन स्पष्ट होत आहे, हा फोटो कोणी काढला ते अजून समोर आलेलं नाही. परंतु या पूल दुर्घटनेत मृत्यूंची संख्या आणखी वाढू शकते हे मात्र नक्की…
राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा –
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंडमळा पूल दुर्घटनेवर सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला ? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, ‘बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे…’ पण मुळात हा प्रसंग का येतो ? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळयाच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही ? बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत ? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग? असा सवाल राज ठाकरेंनी केला.




