हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकतीच पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड (Daund) शहरांमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी बोरावके नगरमध्ये प्राईम टाऊनच्या मागील परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक मृत अर्भक आणि काही मानवी अवशेष आढळले आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी(Police) तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
नेमके काय घडले?
आज सकाळच्या वेळी स्थानिक नागरिकांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात संशयास्पद वस्तू आढळून आल्या. त्यामुळे त्यांनी त्वरित पोलिसांच्या 112 क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर दौंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाहणी करत असताना त्यांना एक सीलबंद बरणी सापडली, ज्यामध्ये अर्भक आणि काही मानवी अवशेष असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सध्या पोलीस हे अवशेष नेमके कुठून आले याचा कसून तपास करीत आहेत.
अर्भक आणि अवशेष कुठून आले?
प्राथमिक तपासानुसार, हे अवशेष वैद्यकीय प्रयोगशाळेतील नमुने असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, हे अर्भक 2020 मधील असल्याची प्राथमिक माहितीही समोर आली आहे. मात्र, या नमुन्यांची अशी अनधिकृत विल्हेवाट का लावली गेली? हे प्रकरण गर्भपाताशी संबंधित आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.
पोलिसांचा पुढील तपास
या प्रकरणाचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी पोलिसांनी वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेतली आहे. प्राप्त झालेल्या नमुन्यांचे न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. परंतु या धक्कादायक घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. त्यांनी, आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. परंतु पुणे जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस घडत असलेल्या अशा धक्कादायक घटनांमुळे प्रशासन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.