नवी दिल्ली । रशिया-युक्रेन संकटामुळे जगभरातील महागाई वाढल्याने भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. यामुळेच मार्चमध्ये आशियातील तिसर्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणांचा वेग मंदावला आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची ताजी आकडेवारी याची पुष्टी करत आहे.
किंबहुना, चलनवाढीच्या चिंतेमुळे व्यापाऱ्यांचा विश्वास कमी झाल्यामुळे, नवीन ऑर्डर आणि कंपन्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगचा वेग कमी झाला आहे. यामुळे, मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय मार्चमध्ये 54.0 पर्यंत घसरला, जो सप्टेंबर 2021 पासून सहा महिन्यांचा नीचांक आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स 54.9 वर होता. मात्र, रोजगाराच्या आघाडीवर दिलासा मिळालेला आहे.
ऑपरेशन मध्ये सुधारणा
मिळालेल्या माहितीनुसार, सलग नऊ महिने कंपन्यांच्या कामकाजात सुधारणांचा ट्रेंड सुरू आहे. मार्चमध्येही ऑपरेशनल आघाडीवर परिस्थिती ठीक होती. पीएमआय अर्थव्यवस्थेची आर्थिक स्थिती दर्शवते. 50 वरील पीएमआय तेजी दर्शवते आणि त्याखालील आकडा घट दर्शवतो.
कच्च्या मालाच्या किमतीत वाढ
S&P ग्लोबल इकॉनॉमिस्ट पॉलिना डी लिमा म्हणतात की,” 2021-22 च्या शेवटी भारतातील मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधील वाढीचा वेग मंदावला आहे.” कंपन्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या नवीन ऑर्डर आणि उत्पादन मंदावले आहे. या काळात रसायने, कापड, खाद्यपदार्थ आणि धातू यांसारख्या क्षेत्रात कच्च्या मालाची किंमत वाढली आहे.”
परदेशी मागणीत घट
S&P ग्लोबलने तयार केलेल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की,” महागाईच्या वाढत्या दबावाचा परिणाम आता कंपन्यांवर दिसून येत आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतीमुळे जून 2021 नंतर पहिल्यांदाच परदेशी मागणीत घट झाली आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेतही नरमाई येण्याची चिन्हे आहेत.”
पुरवठा आघाडीवर अजूनही समस्या
लीमा म्हणतात की,”रशिया-युक्रेन युद्धानंतरही पुरवठ्याची समस्या कायम आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत विक्रमी वाढ आणि पुरवठा खंडित झाल्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. कारण, भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे क्रूडच्या किंमती वाढल्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही दिसून येत आहे. मात्र, येत्या काळात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.”