शि. द. फडणीस : गालावरची कळी खुलवणारा अवलिया!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शालेय जीवनातील गणितासारखे अवघड विषयही ज्यांच्या चित्रांमुळे सुसह्य झाले असे व्यंगचित्रकार म्हणजे शिवराम दत्तात्रेय फडणीस तथा शि.द. शालेय आठवणींच्या जगात शिदंची व्यंगचित्रे आजही सर्वांच्या आठवणीत नक्कीच असतील यात मला शंकाच नाही. २९ जुलै १९२५ रोजी जन्मलेले शिदं आजही वयाच्या ९७ व्या वर्षी कार्यरत आहेत. आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीने फडणीस यांनी पाच दशकांहून अधिक वर्षे वाचकांना हसवले आहे. व्यंग्यचित्रे ही नेहमी वेडीवाकडी असतात, त्यांत नेहमी बोचरी टीका असते, असे समज फडणीसांच्या चित्रांनी खोटे ठरवले. विसंगती टिपणारे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांतून रेखाटले, आणि विसंगतीतून किती निर्विष, सुखावणारा विनोद निर्माण करता येतो, याचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्या शब्दविरहित चित्रांनी अनेक नियतकालिकांची, पुस्तकांची मुखपृष्ठे सजली आहेत.

बेळगाव जिल्ह्यातले भोज हे शि.द. फडणीसांचे जन्मगाव असले, तरी ते कोल्हापुरात वाढले. कोल्हापुरात चित्रकलेसाठी अतिशय पोषक असे वातावरण होते. मंडईत किंवा रंकाळ्याला वगैरे ठिकाणी स्केचिंगसाठी मुले जात असतात. फडणीसही या मुलांमध्ये असत. चित्रकलेतली साक्षरता तपासणाऱ्या एलिमेंटरी आणि इंटरमीजिएट ग्रेडच्या परीक्षा शि.द. फडणीसांनी दिल्या, तेव्हा आपल्यातही एक चित्रकार दडला आहे, हे त्यांना कळाले. कलाशिक्षणाची पंढरी असलेल्या मुंबईतील जे. जे. कलामहाविद्यालयात मग त्यांनी प्रवेश घेतला. जे. जे. मधील शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि व्यंगचित्रकलेची अतिशय आवड असल्याने शि. द. हे अनंत अंतरकर यांच्या मदतीने पुण्याला गेले. तेव्हापासून त्यांची चित्रे ’हंस’, ’मोहिनी’, ’नवल’, या मासिकांतून आणि अनेक पुस्तके व नियतकालिकांतून प्रसिद्ध होत राहिली. पुढे १९५२ सालापासून सलग साठ वर्षं अंतरकरांच्या ‘मोहिनी’च्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ रेखाटण्याचा विक्रमही शिदेंनी केला. त्यांच्या हसरी गॅलरी, ‘चित्रहास’, ‘चिमुकली गॅलरी’ ही चित्रांची प्रदर्शनेही ४० वर्षांत जवळजवळ २० वेगवेगळ्या शहरात मांडण्यात आली आहेत. चित्रकारांची चित्रे त्यांच्या परवानगीशिवाय वापरली जाऊ नयेत यासाठी, शि.द. फडणीस यांनी कायद्याच्या मदतीने प्रताधिकाराचे, म्हणजे कॉपीराइटचे हक्क चित्रकारांना मिळवून दिले. रेषाटन या आत्मचरित्रात त्यांनी आपल्या समृद्ध जगण्याचे चित्र रेखाटले आहेत. एका लेखांत शिदंनी स्वतःविषयी सांगितलेल्या गोष्टी खाली देत आहे.

“महाराष्ट्रातील आणि जगभरातील अनेक हास्य चित्रकारांची चित्रं मला प्रेरणा देणारी वाटली. मला ती अतिशय आवडली. मात्र त्यांच्यापैकी कुणाहीसारखं मला व्हायचं नाही, मला शि. द. फडणीसच व्हायचं आहे, अशी माझी धारणा होती. तुमची शैली म्हणजेच तुमच्या चित्रकलेचा चेहरा. कुणाचंही अनुकरण केलं नाही की तो आपोआप तुम्हाला मिळतो. चित्रकलेतून मी हास्यचित्राकडे वळलो. प्रथम मी ही वाट गांभीर्याने घेतलीच नाही. मनोरंजनाच्या पलीकडे यात काय असणार? एक चित्रकार म्हणून सृजनात्मक कामाचं असं कोणतं आव्हान इथे असणार? हास्यचित्र या माध्यमात मी विविध प्रकार हाताळू लागलो तेव्हा उमजलं की हे प्रकरण दिसतं तेवढं बाळबोध आणि उथळ नाही. त्याच्या खोलीचा अंतच लागत नाही.

प्रथम आणि आजही मला विचारलं जातं की मी व्यंगचित्राचं शिक्षण कुणाकडून घेतलं? कोणत्या कला महाविद्यालयात? अशा शिक्षणाची अद्याप तरी कोणत्याही कला महाविद्यालयात सोय नाही. माझ्या ‘फडणीस गॅलरी’ या पुस्तकाच्या प्रारंभी एक चित्र आहे. नारळीच्या झाडाची शिडी करून एक युवक वर चढतो आहे. स्वयं शिक्षणातून आपली शिडी आपण बनवायची आणि वर चढायचं. महाराष्ट्रातील आणि जगभरातील अनेक हास्य चित्रकारांची चित्रं मला प्रेरणा देणारी वाटली. मला ती अतिशय आवडली. मात्र त्यांच्यापैकी कुणाहीसारखं मला व्हायचं नाही, मला शि. द. फडणीसच व्हायचं आहे, अशी माझी धारणा होती. तुमची शैली म्हणजेच तुमच्या चित्रकलेचा चेहरा. कुणाचंही अनुकरण केलं नाही की तो आपोआप तुम्हाला मिळतो.

उत्तम व्यंगचित्रकार होण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता आहे. तुमच्या भोवतालच्या जगाचं निरीक्षण, विनोदबुद्धी आणि चित्रकलेची भाषा. व्यंगचित्रकार होण्यासाठी प्रथम चित्रकलेचं शिक्षण हवं. व्यंगचित्र ही एक भाषा आहे. ती भाषा तुम्हाला शिकता आली की व्यंगचित्रांच्या अनेक वाटा, प्रकार, तुम्ही हाताळू शकता. अनेक प्रकार मी हाताळले. निखळ आनंद देणारी हास्यचित्रं आणि शब्दविरहित चित्रं, भाषा आणि देश यांच्या सीमा सहज ओलांडतात. याची प्रचीती अनेकदा मला आली. पुस्तकं, प्रदर्शनं इत्यादी माध्यमांतून माझी अनेक चित्रं भारतात आणि परदेशात प्रसिद्ध झाली.

१९७६ च्या सुमारास महाराष्ट्र शासनाच्या पाठय़पुस्तक मंडळाकडून एक प्रस्ताव आला होता. त्यानुसार इयत्ता पहिली ते चौथी या प्राथमिक शाळेतील मुलांसाठी गणिताची पुस्तकं सचित्र करायचा. आठ भाषेत सर्व स्तरांतील लाखो मुलांपर्यंत माझी गणितावरची सचित्र पुस्तके पोचली. तुलनेनं हे काम काहींना मौलिक व महत्त्वाचं वाटतं. वरील शैक्षणिक स्वरूपातील माझं काम त्या क्षेत्रातील लोकांपर्यंत पोचतं. बहुतेक रसिक वाचकांना माझी ललित साहित्यातील चित्रं माहीत आहेत. विशेषत: विनोदी साहित्य. कोल्हटकर, गडकरी, चिं. वि. जोशी, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, द.मा.मिरासदार, दिलीप प्रभावळकर इत्यादी अनेकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे- सुमारे पाचशे, तसेच इतर चाळीस एक पुस्तके संपूर्ण सचित्र केलेली आहेत. पु. भा. भावे, महादेवशास्त्री जोशी यांसारख्या गंभीर विषयातील लेखकांचे साहित्यही सचित्र केले. सावरकरांचे ‘काळे पाणी’ त्यापैकीच!

चित्रांचं साहित्यात स्थान काय? तसंच व्यंगचित्राचं चित्रकलेत स्थान काय? याबाबत अनेक वर्षांपासून चर्चा, संभ्रम आणि अपसमज आहेत. तुलनेनं अलीकडची पिढी अधिक जिज्ञासू आणि समजदार आहे. हास्यचित्राविषयी पूर्वी गमतीनं म्हणायचे, ‘व्यंगचित्र’? ‘एकदम सोप्पं! सरळ चित्र काढायला सुरुवात करा. जमलं तर चित्र, नाही जमलं तर व्यंगचित्र नक्कीच होणार.’ हा विनोद सोडून द्या. पण त्यातील सृजनाचा भाग महत्त्वाचा असतो हे अनेकांना माहीत नसतं. कष्ट हाताला पडतात म्हणजे कारागिरी क्राफ्ट एवढंच नसतं. स्वतंत्र हास्यचित्र हे पेंटिंग, साहित्य, कविता या अंगाने प्रवास करतं. बीजरूपानं विषय सुचला- अंतर्मनाला दिसला की अनेक पर्याय सुचत जातात. अबोध मनातले हे पर्याय मग स्केच बुकात उतरतात आणि कल्पना आकार घेते. हे सर्व कसं घडतं? याचा काही फॉम्र्युला? कोणत्याही कलेबाबत सांगत येत नाही. म्हणून तर तो शोध घ्यायचा असतो.

जेव्हा कल्पना सुचते त्यावेळी तिला फक्त अस्तित्व असतं. स्वत:ला प्रकटण्यासाठी ती भाषा निवडते. ती भाषा असेल शब्द, चित्र, सूर, शिल्प, नृत्य इत्यादी. शब्दशक्तीचं महत्त्व आहेच. सर्व क्षेत्रांशी संवाद हे त्यांचं सर्वमान्य बलस्थान. शब्दाच्या सर्व तरल छटा ओळखून जेव्हा एखादा माणूस कलात्मक पातळीवर लिहितो, तेव्हा तो लेखक झालेलाच असतो. कवीही झालेला असतो. माणसाचा प्रत्येक अनुभव शब्दातून मांडता येणार नाही. शब्द संवादालाही मर्यादा आहे. साहित्य हे संस्कृतीचा एक भाग आहे. फारच थोडय़ा लेखकांना ललितकलांचं भान असतं.

कोणतीही व्यक्ती संपूर्ण निर्दोष, आदर्श अशी दैवी गुणसंपन्न आढळणं अशक्यच. कुठे तरी आचारविचारातील त्रुटी, विसंगती आढळते. हेच व्यंगचित्रांचे विषय ठरतात. मग ते राजकीय असो अगर निखळ आनंद देणारे. जेव्हा जेव्हा माणूस तारतम्यापासून दूर जातो, तेव्हा हास्यचित्र त्यावर प्रकाश टाकतं. हास्यचित्राचं नातं शहाणपणाशी आहे. विद्वत्तेशी नाही. हास्यचित्रं ही उपयोजित कला आहे. लोककला आहे. लोकांशी संवाद हे त्याचं प्रमुख प्रयोजन आहे. ”महाराष्ट्राला हसवणारा हा अवलिया व्यंगचित्रकार चित्रकार मराठी मातीतला दिलखुलास खेळीया आहेत. ते शतायुषी होवोत ही सदीच्छा.
– प्रतिक पुरी

माहिती संदर्भः लोकसत्ता, इंटरनेट