खोडशीजवळ इनोव्हाची रिक्षाला जोराची धडक : गोटेतील 1 ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पुणे- बंगलोर महामार्गावर खोडशी (ता. कराड) गावच्या हद्दीत हाॅटेल पद्मा समोर सातारा ते कराड लेन वरती रिक्षाला पाठिमागून इनोव्हा कारने जोराची धडक दिली. यामध्ये रिक्षा रस्त्याशेजारी असलेल्या एका खड्ड्यात जावून पलटी झाली. अपघातात रिक्षाचालक जाकीर महमद शेख (वय- 50, रा. गोटे, ता. कराड) हे ठार झाले आहेत. तर इनोव्हाचा चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातार ते कराड लेनवरती रिक्षा (MH -50 -M- 0242) ला पाठिमागून भरधाव वेगाने आलेल्या (MH-12- NJ-1010) कारने जोराची  धडक दिली. कारची धडक इतकी जोरात होती, की रिक्षा रस्त्यावरून उडून रस्त्याच्या कडेला असलेल्या खड़्ड्यात जाऊन पलटी झाली. त्यामध्ये रिक्षा चालक जाकीर शेख हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना हायवे हेल्पलाईनच्या कर्मचाऱ्यांनी हायवे रूग्णवाहिका बोलावून गोटे ग्रामस्थांच्या सहकार्याने कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु तेथे डाॅक्टरांनी जखमी जाकीर शेख यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

घटनास्थळी हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा, अमित पवार, प्रकाश गायकवाड व गोटे गावच्या ग्रामस्थांनी मदत केली. कराड शहर पोलिस स्टेशनचे खालीद इनामदार व प्रशांत जाधव यांनी धाव घेतली होती. तसेच रात्रीच्या मुसळधार पावसात पोलिसांनी वाहतूक व्यवस्थित करत, अपघातातील वाहने बाहेर काढण्याचे काम केले.