कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी अभिनव प्रयोग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मानसी जोशी

हवामान बदल आणि निसर्गाच्या बदलत्या चक्राचा शेतीवर परिणाम होत असतानाही महाराष्ट्रातील काही संस्था, तसेच शेतकरी मात्र त्यावर मात करून वैविध्यपूर्ण प्रयोग करताना दिसत आहेत. लोकसहभागातून, तसेच वैयक्तिक पातळीवरील प्रयत्नातून शेती वाचवण्यासाठी, त्याचबरोबर पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करत आहे. त्यांच्या या कामातून विपरीत परिस्थितीतही शेतीतील उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होत आहे. अशाच काही संस्था तसेच लोकांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सोयासंजीवनी


सध्या निवृत्त झालेले वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. बी.पी. पाटील हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सोया संजीवनी नावाचा प्रकल्प राबवत आहेत. त्यांनी सोयाबीनच्या विविध वाणांचा अभ्यास करून शेतकऱ्यांसाठी खास नैसर्गिक पध्दतीने फवारणी करणारी द्रव्याची निर्मिती केली आहे. या प्रकल्पाला पुण्याच्या IRDAI या संस्थेने आर्थिक सहाय्य केले आहे. यामध्ये १५० शेतकरी सहभागी झाले आहेत. यामुळे या शेतकऱ्यांचे सोयाबीनचे उत्पादन २ ते ४ क्विंटलने वाढले.

धुळे जिल्ह्याचा कायापालट करणारा अवलिया


नुकताच राज्य शासनाने धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावातील चैत्राम पवार यांना वनभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. त्यांनी जंगल, जल, जमीन, जनावर आणि जन या पंचसूत्रीवर आधारित जनजागृती मोहीम हाती घेऊन आपल्या गावाचा कायापालट केला. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी वनखात्याच्या ओसाड जमिनीचे हिरवाईत रुपांतर केले. वनवासी कल्याण आश्रमासोबत त्यांनी देशातील शाळांमध्ये जाऊन वन संवर्धनासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण केली आहे.

युवा परिवर्तनचे उल्लेखनीय काम –


युवा परिवर्तन या सामाजिक संस्थेतर्फे महिला तसेच गरजू मुलांना स्किल ट्रेनिंग कोर्स शिकवले जातात. महाराष्ट्रातील पालघर, गडचिरोली या जिल्ह्यात स्किल ट्रेनिंग देत असताना त्यांनी वाडा तालुक्यातील ५० गावांमध्ये पावसाचे पाणी जमिनीत कसे मुरवावे, याचबरोबर सौरउर्जेचा वापर याविषयी मार्गदर्शन केले. पालघरमधील सोनाळे गावात वाहणाऱ्या नदीला पावसात चांगले पाणी असायचे. मात्र, उन्हाळ्यात हीच नदी कोरडी झाल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागायचे. गुरांना तसेच बाकीच्या इतर कामांना पाणी मिळायचे नाही. यावर उपाय म्हणून तीन महिन्यापूर्वी गावकऱ्यांच्या श्रमदानातून नदीवर बांध बांधून पाणी अडवले. तसेच गावकऱ्यांना पाणी कसे वाचवायचे याबद्दलही सांगितले. यातून पावसाळ्यात हे छोटे तलाव भरून गेले. या भागातील भूजल पातळीही यातून वाढली.