औरंगाबाद – मराठवाड्यातील शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनात पदव्युत्तर विभागाच्या सहाय्यक कुलसचिव हेमलता ठाकरे गेल्या २ महिन्यांपासून बसण्याची व्यवस्था न केल्याने जमिनीवर बसूनच कामकाज करत आहेत. यासोबतच वारंवार एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली करणे, काम करत असतांना दबाव आणणे या गोष्टीही त्यांच्यासोबत करण्यात आल्या. परीक्षा विभागात सुरू असलेल्या काही अनधिकृत आर्थिक बाबींच्या विरोधात पावले उचलल्याने तसेच त्यात हस्तक्षेप केल्याने आपल्याला ही वागणूक दिल्याचे ठाकरे यांनी वारंवार सांगितले होते. तसेच यासंदर्भात ऑल महाराष्ट्र ट्राईबल स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुनसिंग वसावे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे पत्र लिहून विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी केली होती.
वसावे यांनी आपल्या पत्रात म्हटले होते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील मराठवाडा आदिवासी महिला कुलसचिव श्रीमती हेमलता ठाकरे यांना अपमानास्पद वागणुक देवुन त्रास दिला जात आहे. प्रशासकीय कर्तव्य उपकुलसचिव महिलेला टेबल व खुर्ची न देता त्रास देण्यात येत असुन असे असतांनाही सदर महिला अधिकारी जमिनीवर सतरंजी टाकुन आपले कर्तव्य पार पाडत आहे. तसेच महिला उपकुलसचिवला अशी अपमानास्पद वागणूक देणाऱ्या मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरु प्रमोद येवले, परिक्षा मुल्यमापन मंडळ योगेश पाटील, कुलसचिव जयश्री सुर्यवंशी यांना बडतर्फ करुन कारवाई करावी, अशी मागणी देखील अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी केली होती.
यानुसार या पत्राची दखल घेऊन राज्य महिला आयोगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवांना पत्र लिहून या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा १९९३ कलम १२(२) व १२(३) नुसार आयोग कार्यालयास सात दिवसांत पाठवावे असे आदेश दिले आहेत. आता यावर विद्यापीठ प्रशासन काय चौकशी करून कारवाई करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.