Sunday, May 28, 2023

शत्रूंना धडकी भरणार; INS Vagir आज भारतीय नौदलात दाखल होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय नौदलाची (Indian Navy) समुद्रातील ताकद वाढणार आहे. कलवरी वर्गाची पाचवी पाणबुडी INS वागीर (INS Vagir) आज 23 जानेवारीला नौदलात दाखल होणार आहे. शत्रूला धडकी भरवणाऱ्या या पाणबुडीला सायलेंट किल्लर असेही म्हंटल जातंय. INS वागीर स्कॉर्पियन डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. नौदल प्रमुख अॅडमिरल हरी कुमार यांच्या हस्ते आयएनएस वागीर भारतीय नौदलात दाखल होणार आहे. यावेळी पश्चिम नौदल कमांडचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आयएनएस वागीरच्या मदतीने नौदलाला पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्तचर माहिती गोळा करणे, समुद्रात भूसुरुंग टाकणे आणि कोणावर पाळत ठेवण्याच्या कामात मोठी मदत मिळणार आहे. या पाणबुडीचे बांधकाम जुलै 2009 मध्ये सुरू झाले आणि नोव्हेंबर 2020 मध्ये तिला वागीर असे नाव देण्यात आले. या पाणबुडीमध्ये अत्याधुनिक ध्वनिकीय अवशोषण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून या तंत्रज्ञानाने बनवलेली ही पाणबुडी रेकॉर्ड ब्रेक वेळेत तयार करण्यात आली आहे.

काय आहेत आयएनएस वागीरची वैशिष्ट्ये –

1) 67 मीटर लांब, 21 मीटर उंच या पाणबुडीचा वेग पाण्याच्या वर ताशी 20 किलोमीटर आणि पाण्याखाली ताशी 40 किलोमीटर असेल. एकावेळी, 50 हून अधिक खलाशी आणि नौदल अधिकारी त्यात काम करू शकतात.

2) ही पाणबुडी समुद्रात जास्तीत जास्त 350 मीटर खोलीपर्यंत जाऊ शकते आणि सलग 50 दिवस समुद्राखाली राहू शकते.

3) ही पाणबुडी स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्यामुळे शत्रू सहजासहजी याचा शोध घेऊ शकणार नाही.

4) आयएनएस वागीर आधुनिक नेव्हिगेशन आणि ट्रॅकिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

5) आयएनएस वागीरची सोनार आणि रडार यंत्रणा देखील उत्तम आहे.