हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – उद्या मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये सामना होणार आहे. पंजाब किंग्सबरोबर सामना खेळण्याअगोदर मुबई इंडियन्सला मोठी चिंता सतावत आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने हि चिंता व्यक्त केली आहे.
काय म्हणाला ट्रेंट बोल्ट
” उद्या आमचा सामना पंजाब किंग्सबरोबर होणार आहे. पण यावेळी एक चिंता सतावत आहे आणि ती म्हणजे पंजाबकडे फार चांगले फलंदाज आहेत आणि त्यांचा सामना करणे ही एक आव्हानात्मक गोष्ट आहे. कारण लोकेश राहुल आणि ख्रिस गेलसारखे धडाकेबाज फलंदाज पंजाबच्या संघाकडे आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मधल्या फळीतही चांगली फलंदाज आहेत. त्यामुळे त्यांना गोलंदाजी करणे नक्कीच सोपे नाही.” अशी चिंता ट्रेंट बोल्ट याने व्यक्त केली आहे.
तसेच ” लोकेश राहुल जेव्हा आपल्या फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो जगातला आघाडीचा फलंदाज असतो. कारण फॉर्ममध्ये असल्यावर त्याच्याकडून दमदार फलंदाजी पाहायला मिळते. त्यामुळे त्याला रोखणे हे मोठे आव्हान असेल. त्याचबरोबर ख्रिस गेलसारखा अनुभवी खेळाडू पंजाबकडे आहे. आतापर्यंत गेलने एकहाती सामनेही फिरवलेले आहेत. त्यामुळे गेलला गोलंदाजी करणे हे कधीच सोपे नसते.” तसेच सध्या टी- २० क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा डेव्हिड मलान हादेखील पंजाब संघात आहे. मलानने आतापर्यंत आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर अनेक गोलंदाजांना धूळ चारली आहे. त्यामुळे मलान या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
ट्रेंट बोल्ट डेव्हिड मलानबाबत म्हणाला कि, ” मी मलानविरुद्ध जास्त सामने खेळलेलो नाही. पण गेल्यावेळी जेव्हा मलानविरुद्ध खेळत होतो तेव्हा त्याने त्या सामन्यात शतक झळकावले होते. मलान हा एक स्फोटक फलंदाज आहे आणि त्यामध्ये जर त्याला लय भेटली तर त्याला रोखणे हे फार कठीण काम आहे. कारण मलान एकदा फटकेबाजी करायला लागला की, त्याला गोलंदाजी करणे एवढे सोपे नसते. एकंदरीत पंजाबची फलंदाजी ही त्यांची सर्वात जमेची बाजू आहे. कारण त्यांच्याकडे चांगले अनुभवी आणि स्फोटक फलंदाज आहेत.” त्यांना कमीत कमी धावांत रोखणे हे मुंबईसमोर मोठे आव्हान असणार आहे.