हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन IPL 2025 Eliminator। आयपीएल २०२५ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्सया ४ संघानी प्ले ऑफ मध्ये धडक मारली आहे. यातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू मध्ये आज क्वालिफायर १ चा सामना होईल. यात हो हरेल त्याला क्वालिफायर २ खेळण्याची संधी मिळेल. परंतु उद्याच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात मात्र दुसरी संधी नाही. जो जिंकेल तो वर जाईल, आणि जो पराभूत होईल तो स्पर्धेतून बाहेर जाईल अशी परिस्थिती आहे. अशावेळी जर समजा उद्या पाऊस पडला आणि ऐनवेळी सामना रद्द झाला तर काय होईल? कोणाला फायदा होईल आणि कोणत्या संघाचा खेळ खल्लास होईल याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. त्यासाठी आपल्याला आयपीएलचा नियम जाणून घेणं गरजेचं आहे.
उद्याचा एलिमिनेटर सामना रद्द झाला तर?? IPL 2025 Eliminator-
आयपीएल एलिमिनेटर सामना (IPL 2025 Eliminator) हा प्लेऑफचा टप्पा आहे जिथे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे संघ एकमेकांशी भिडतात. या सामन्यातील विजेता संघ क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश करतो, तर हारणाऱ्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येत. म्हणजेच काय तर दोन्ही संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. परंतु बीसीसीआयने या महत्वाच्या सामन्यासाठी कोणताही रिजर्व डे ठेवलेला नाही. त्यामुळे समजा चुकून जरी पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला तर एका संघाचं नुकसान होणार हे निश्चित…. यंदा दुर्दैवाने मुंबई इंडियन्सला याचा फटका बसू शकतो. कारण आयपीएल पॉईंट टेबल मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे तर गुजरात टायटन्स तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे जर पावसामुळे उद्याचा एलिमिनेटर सामना रद्द करण्याची वेळ आली तर मुंबईला आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे. IPL 2025 Eliminator
दोन्ही संघ तुफान फॉर्मात –
दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. मुंबईकडे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या सारखे इन फॉर्म फलंदाज आहेत. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट सारखे जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही विभागात मुंबई इंडियन्सने चांगली कामगिरी केली आहे. खास करून स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई चांगलीच लयीत आल्याचं दिसलं. तर दुसरीकडे गुजरात टायटन्सने आयपीएल च्या सुरुवातीपासूच आपली हुकूमत राखली आहे. सलामीवीर शुभमन गिल आणि साई सुदर्शन या जोडगोळीने यंदा खोऱ्याने धावा काढल्या आहेत. दोघांनी एकहाती गुजरात प्ले ऑफ मध्ये नेलं आहे. मधल्या फळीत जॉस बटलर, रुदरफोर्ड, शाहरुख खान यांनीही गरज पडेल तेव्हा आपली पॉवर दाखवली आहे. गोलंदाजी विभागात प्रसिद्ध कृष्णा, मोहमंद सिराज, रशीद खान सारखे दमदार बॉलर आहेत. एकूणच काय तर दोन्ही संघात बडे खेळाडू असल्याने उद्या रोमांचक सामना होईल यात काही शंका नाही…. पण उद्या पाऊस नको रे बाबा अशी प्रार्थना मुंबई इंडियन्सचे चाहते करतील.




