‘या’ गणपतीचे दर्शन घेताच जुळतय लग्न; दर बुधवारी भरतो प्रेमी युगुलांचा मेळावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाराष्ट्रात मानाच्या गणपतीमध्ये मुंबईचा लालबागचा राजा, पुण्यातील दगडूशेठ मंदिर, मोरगावचा गणपती अशा अनेक गणपतींचा समावेश आहे. या मानांच्या गणपतीकडे आपण कोणतीही इच्छा मागितली तर ती पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. परंतु राजस्थानमध्ये असे एक अनोखे गणपतीचे मंदिर आहे जिथे प्रेमी युगूल एकत्र राहण्यासाठी आणि लग्न होण्यासाठी नवस मागतात. थोडक्यात काय तर, राजस्थान मधील हा गणपती बाप्पा एका प्रकारचा लव्ह गुरूच आहे. याठिकाणी असलेल्या गणपती मंदिराचे नाव देखील इश्किया गणेश मंदिर असेच आहे.

राजस्थानमधील जोधपूर येथे असणारे इश्किया गणेश मंदिर प्रचंड प्रसिद्ध आहे. दरवर्षी गणेश चतुर्थीला येथे जत्रा भरते. याठिकाणी चतुर्थीच्या दिवशी मोठ्या संख्येने प्रेमी युगुल नवस बोलण्यासाठी येतात. इश्किया गणपती प्रेमी युगुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. इश्किया गणेश मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केल्यास अविवाहित प्रेमी युगुलांची लग्न लवकर होतात अशी देखील मान्यता आहे. या गणेश मंदिरात येऊन दर्शन घेतल्यानंतर आपल्याला हवा तो जोडीदार मिळतो असे देखील सांगितले जाते.

त्यामुळे या इश्किया गणेश मंदिरात येऊन अनेक जोडपी येऊन गणपतीला साकडं घालतात. तसेच एकत्र येण्यासाठी नवस बोलतात. जोधपुर मधील या मंदिराची स्थापना शंभर वर्षांपूर्वी झाल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. जोधपुर मधील एका शहराच्या अरुंद गल्लीतच इश्किया गणेश मंदिर आहे. मंदिराचे बांधकामच असे आहे की येथे उभी असलेली व्यक्ती सहज दुरून कोणाला दिसत नाही. त्यामुळे अनेक प्रेमीयुगुल एकमेकांना भेटण्यासाठी छुप्या पद्धतीने या ठिकाणी येतात.

अशा अनेक  कारणांमुळे इश्किया गणेश मंदिर सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. या मंदिरात दर बुधवारी प्रेमी युगुलांचा मेळावा भरतो. तसेच याठिकाणी गणपतीला लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी अनेक जोडपी येतात. हे मंदिर पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी बारापर्यंत आणि सायंकाळी 5.30 ते रात्री 9 या वेळेत असते. यावेळेत मंदिरात प्रेमी युगुलांची गर्दी दिसून येते.