व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

औरंगाबादची महिला प्रियकरासोबत सौदीला गेली पळून, परत आल्यावर उघडकीस आले धक्कादायक कृत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी भारतात आलेल्या सीमा हैदरचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. त्यानंतर याच प्रेम प्रकरणातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूच्या घटनेने देखील सर्वांनाच आणखीन एक धक्का दिला. आता ही दोन्ही प्रकरणे शांत झाल्यानंतर औरंगाबादमध्ये अशीच एक तिसरी घटना घडली आहे. औरंगाबादमधून एक महिला थेट सौदीला पळून गेल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर, सौदीला गेल्यानंतर ती महिला देशविघातक कृत्यात सामील झाल्याची मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथे राहणाऱ्या एका महिलेची सोशल मीडियाच्या माध्यमातून एका सौदी तरुणाशी ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ही महिला डिसेंबरच्या काळात त्याच्या मदतीने सौदीला पळून गेली. यानंतर तिच्या नवऱ्याने पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवली. परंतु ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही महिला पुन्हा भारतात आली आहे. सध्या ती आपल्या माहेरी नाशिक शहरात राहत आहे. परंतु या काळातच पोलिसांना एक ईमेल आला ज्यामध्ये ही महिला देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचे समोर आले.

सौदीला गेल्यानंतर या महिलेने दहशतवादी संघटनामध्ये सहभाग नोंदवला. तसेच ती देशविघातक कृत्यात सहभागी झाली अशी माहिती पोलिसांना आलेल्या मेलमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी या घटनेचा संपूर्ण तपास सुरू केला आहे. आता या सर्व प्रकरणाची एटीएसकडून दखल घेण्यात आली आहे. सध्या हा मेल कुठून आला, तसेच यामध्ये या महिलेचा उल्लेख कसा केला गेला याची पोलीस चौकशी करत आहेत. तर या महिलेला ताब्यात घेऊन तिची देखील विचारपूस सुरू आहे.

दरम्यान, आपल्या प्रियकराच्या मदतीने सौदीला गेलेल्या महिलेने काही दिवस सौदीतच काढले. यानंतर ती वेगवेगळ्या देशात देखील फिरली. परंतु आता ही महिला पुन्हा भारतात आली आहे. आता याच महिलेबाबत पोलिसांना एक मेल आल्यामुळे या सर्व घटनेमागील सत्य काय याचा तपास पोलीस घेत आहेत. या एका मेलमुळे सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.