औरंगाबाद शहरावर निर्बंध लावणे अन्यायकारक आहे; निर्बंध हटवा अन्यथा… – सुहास दाशरथे

औरंगाबाद : डेल्टाप्लसमुळे औरंगाबाद सहा राज्यात निर्बंध लावण्यात आले आहे. यामुळे समस्त व्यापारी वर्गासह नागरिकांकडून सुद्धा नाराजीव्यक्त होत आहे. सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहतील आणि दुपारी ४ ते सकाळी ७ पर्यंत संचार बंदी असेल. तसेच शनिवार रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद असेल. अशा प्रकारचे हे निर्बंध आहेत.

सर्व काही सुरळीत झाल्याचे दिसत असतानाच पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियम, अटींचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी आक्षेप घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या निर्णयात दोन दिवसांत बदल करावा असा अल्टिमेटम त्यांनी दिला आहे.

दाशरथे म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून औरंगाबाद जिल्हा सावरलेला आहे. कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. लोक नियमांचे पालन करत आहेत. राज्य सरकारने डेल्टा प्लसच्या नावाखाली कडक निर्बंध लागू केले. पण नियम लागू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाला अधिकार दिले. जिल्ह्याची परिस्थिती पाहता राज्याचे नियम जिल्ह्यात लागू करण्याची गरज नाही. तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी ७ दुपारी ४ वाजेपर्यंत व्यवहाराला परवानगी दिली आहे. हे अन्यायकारक आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे व्यापारी, कामगारांसह नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच निर्बंध पुन्हा कडक केल्याने त्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे सकाळी सात ते रात्री सातपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी दाशरथे यांनी केली आहे. दोन दिवसांत नियमांत बदल न केल्यास मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.