औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वनस्पतिशास्त्र उद्यानात उभारण्यात येणार होता. 14 मे रोजी वनस्पती उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे भूमिपूजन अधिसभा सदस्य विजय सुबुकडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर हे भूमिपूजन वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.
रिपाईचे युवक मराठवाडा अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी या पुतळ्या संदर्भात आक्षेप घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या चेहऱ्याच्या दिशा परस्पर विरोधी असल्याने भविष्यात सामाजिक दुहीकरणास वाव मिळेल असा आरोप करत पुतळ्याची दिशा बदलण्याची मागणी त्यांनी केली होती.
त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमीपूजन झालेच नाही, असा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला होता. उद्यानात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला तर जैवविविधतेचे नुकसान होईल अशा पद्धतीचा आक्षेप काहींनी घेतला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात पुतळा समितीची बैठक झाली. त्यावेळी समितीने तीन ठिकाणाचे प्रस्ताव विद्यापीठाला दिले होते. इतिहास वस्तुसंग्रहालयातील उद्यान, मानव विद्याशाखेचे इमारती जवळील चौक आणि प्रशासकीय इमारती समोरील परिसर यापैकी शासकीय इमारती समोरील पुतळा उभारण्यात आता मान्यता देण्यात आली आहे.