हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सुविधा भूमी अभिलेख विभागाने सुरू केली आहे. आता शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने शेतसारा भरण्याची सुविधा मिळणार आहे. शेतसारा भरण्याची नोटीस महाभूमी संकेतस्थळावरील ई-चावडीवर प्रसिद्ध केली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतसारासंबंधीची माहिती सहज उपलब्ध होणार असून, त्यांना वेळेवर कर भरण्यात सोय होणार आहे. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना आणि शासनाला होणार आहे .
शेतसारा ऑनलाईन भरता येणार –
याआधी तलाठ्यांना प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन शेतसारा वसूल करावा लागत होता. पण आता हि प्रणाली बदलणार असून, हि सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. म्हणजेच आता तलाठ्यांना घरोघरी जाण्याची गरज बसणार नाही. शेतकरी स्वतःही हि प्रक्रिया मोबाईलवरून करू शकतात. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना किती थकीत भरणे बाकी आहे, याचीही माहिती उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे शेतसाऱ्याच्या पेमेंटची माहिती सहज मिळवता येईल.
या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना फायदा –
ई-चावडीवर शेतसारा ऑनलाईन भरण्याची सुविधा 100 दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये समाविष्ट आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना सर्व्हे नंबरनुसार किंवा खातेदारनिहाय शेतसारा आणि थकीत करांची माहिती ई-चावडीवर उपलब्ध होणार आहे. तसेच या शेतकऱ्यांना त्याची प्रत डाऊनलोड करता येणार आहे. राज्यातील 35 हजार 837 गावांची शेतसारा मागणी निश्चिती प्रक्रिया पूर्ण झाली असून, 10 हजार 389 गावांमध्ये 100 टक्के शेतसारा वसुली पूर्ण करण्यात आली आहे.