हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – पाणी हे जीवन म्हणून ओळखले जाते. ते नसेल तर माणसाचं काही चालत नाही. पण रोज विनासायास पाणी मिळतं म्हणून आपण त्या पाण्याचा आदर राखत नाही. ते काटकसरीने किंवा जबाबदारीनं वापरत नाही. पाण्याची किंमत ही ज्यांना रोज कैक किलोमीटर भटकंती करावी लागते, ज्यांत कैक तास खर्ची पडतात आणि तरीही शुद्ध पाणी मिळत नाही आणि म्हणून जे आजारी पडतात त्या महिलांना मुलींना विचारा. ज्या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही म्हणून मेहनतीने वाढवलेली त्याची शेती करपून जाते त्याला पाण्याची किंमत विचारा. शहरी माणसाला त्याचं सोयरसुतक नसतं. पण काही शहाणी माणसं अजुनही आहेत ज्यांना ही किंमत कळली आहे. त्यांतलं एक अग्रगण्य नाव म्हणजे विलासराव साळुंखे.
विलासराव साळुंखे हे भूमिहीन मजुरालादेखील पाण्याचे समान वाटप व्हावे, या मागणीसाठी ३० वर्षे लढा देणारे तसेच ‘पाणी पंचायत या संकल्पनेने सामूहिक व्यवस्थापनाद्वारे पाण्याची साठवण व वितरण करून शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास घडवून आणणारे सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३७ रोजी सांगली जिल्ह्यातील धूळगाव येथे झाला. २००२ मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांनी पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली. त्यांचा १९७३ सालीचा पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील पाणलोट क्षेत्रविकास व त्याआधारे शेतीसिंचन हा प्रयोग विलक्षण गाजला व तो नायगाव पॅटर्न या नावाने ओळखला जातो.
त्यांनी जल पंचायतच्या माध्यमातून असंख्य लोक जोडले. त्या सर्वांचे ते मार्गदर्शक, आपुलकीने कायम विचारपूस करणारे वडील मित्र होते. सासवड भागातील सामान्य शेतकऱ्यांचे ‘पाणी बाबा’, ग्रामायनसारख्या स्वयंसेवी चळवळीचे आधारस्तंभ, यशस्वी मराठी उद्योजक, रोज नवीन प्रयोगातून शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करणारे मृदू आणि मितभाषी पण नेमकेपणाने कोरडवाहू शेतकऱ्याच्या गरिबीचे मूळ शोधणारे, माणशी अर्धा एकर पाणी या सिद्धांताचे जनक, पाणीपंचायतीचे संस्थापक, अशी त्यांची विविधांगी ओळख आहे.
बहात्तरच्या दुष्काळामध्ये जेव्हा महाराष्ट्रात लागू असलेल्या व पुढे इतर राज्यांत ज्याचे उदाहरण दिले जाते, अशा रोजगार हमी योजनेबाबत विलासरावांनी फार मूलभूत सूचना केल्या. रस्त्यासारखी दुष्काळी कामे काढून पैसे वाया घालवण्यापेक्षा पाझर तलाव, तळी यांची कामे करून ‘पुढील पावसाचे पाणी साठवण्यासाठी सज्ज राहा’ हा महाराष्ट्राला दिलेला बहुमोल सल्ला आजही दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे व त्या काळातील या धोरणामधील आमूलाग्र बदलास कारणीभूत झालेले व तटस्थपणे महाराष्ट्रातील दुष्काळांचा अभ्यास केलेले इलेक्ट्रिकल इंजिनियर, अॅक्युरेट गेजिंग या स्वतःच्या यशस्वी मेकॅनिकल क्षेत्रातील उद्योजक प्रणेते विलासराव होते.
विलासरावांनी जल पंचायत व पाणी नियोजनाच्या संदर्भात जे बहुमोल काम केलं आहे त्याविषयी त्यांनी एके ठिकाणी लिहिलं होतं की, ‘तुका म्हणे पडिला सत्याचा दुष्काळ काय पंगतीस कोंडा आणि एकांतासी साखर मांडा’, या तुकारामबुवांच्या वाणीची आज चालती बोलती प्रचिती महाराष्ट्रात पडत असलेल्या दुष्काळाने तर आपणाला आणून द्यायची ठरविलेली नाही ना? यावर पर्यायही तुकारामबुवांनी सांगितलेला आहे :
बळ बुद्धि वेचूनिया शक्ति । उदक चालवावे युक्ति ।।
न चळण तया अंगी। धावे लवणामागे वेगी॥
पाट पोट कळा । भरीत पखाला सापळा ।।
बीजा ज्यासी द्यावे । तुका म्हणे तैसे व्हावे ।।
तुकोबांच्या या वचनांत वैज्ञानिक, सामाजिक आणि आर्थिक ह्या तीनही गोष्टींचा समन्वय आहे. तो साधून महाराष्ट्राच्या जलसंपत्तीचे साठे निर्माण करीत असताना त्याच्या न्याय्य वाटपाचाही विचार केला तरच महाराष्ट्र संपन्न होईल, महाराष्ट्रातील जनतेला भरपूर काम मिळेल, सर्वांची शेती फुलली, तरच महाराष्ट्राची प्रगती होईल हा विचार आता ज्याची शेती नाही त्यांनीच केला पाहिजे. तरच नियोजनाची दिशा बदलेल.
सामान्य जनतेला समजावून सांगून प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला वेसण घालण्याचे मोठे काम पाण्याच्या न्याय्य वाटपाच्या विचारात आहे. हा विचार कृतिशील कसा करावयाचा? आज लहान-थोरांना तो करायला लावण्यासाठी जनजागृती आणि समाजप्रबोधन करण्याची मोठी गरज आहे. यथाशक्ती सर्वांनी ते करावे. पाणी साठवा आणि समान वाटा या विचाराचा प्रयोग पुरंदर तालुक्यात पाणी पंचायतीच्या पंधराशे शेतकरी कुटुंबांनी त्यांची तीन हजार एकर जिराईत शेती पाण्याखाली आणून केलेला आहे, त्या करिता साठ लाख रुपये भांडवली खर्च झाला आहे. त्यापैकी लोकांनी वीस टक्के एवढा खर्च स्वतःचे भांडवल उभे करुन केला.
या पाण्याचे वाटप माणशी अर्धा एकर म्हणजे पाच माणसांच्या कुटुंबाला अडीच एकर हया रेशनिंग पद्धतीने केलेले आहे, ऊसासारखे पीक घ्यावयाचे नाही हे बंधन घालून घेतले आहे आणि जमीन विकली तरी पाण्याचे हक्क जमिनीबरोबर जात नसल्यामुळे जमीन विक्रीची सौदेबाजी टाळलेली आहे. पाण्याचा हक्क भूमिहीनांनाही ठेवला. अशा या पाच तत्वांवर ‘पाणी पंचायत’ चा कार्यक्रम आखलेला आहे. त्यामध्ये लोकांचा सहभाग आहे. कुशल नेतृत्व त्यांच्यातूनच पुढे आले आहे. दुसरीकडे काम शोधण्यासाठी जी माणसे फिरत होती ती आपल्या शेतीवर स्थिर झालेली आहेत. त्यांना त्यांच्या शेतावर पुरेसा रोजगार उपलब्ध झालेला आहे. एवढेच नसून ते आज दुसऱ्यांनाही आपल्या लहानशा शेतीवर रोजगारी उपलब्ध करून देत आहेत.
गाव पातळीवर, तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर पाण्याचे साठे निर्माण करून त्याचे एकत्रित नियोजन केले तर सर्वांना माणशी कमीत कमी एक हजार घन मीटर एवढे पाणी उपलब्ध करून देणे टप्प्याटप्प्याने शक्य आहे. माणसाला आणि जनावरांना मिळून माणसी फक्त पंधरा घनमीटर एवढे पाणी वर्षाला लागते. दुष्काळी भागात पडणारा पाऊस जरी कमी असला तरी माणशी चारशे घनमीटर एवढे पाणी निसर्ग आपणाला प्रत्येक गावी दर वर्षी देत असतो. एवढ्या पाण्याचेही नियोजन आम्ही आजपर्यन्त करू शकलो नाही. म्हणून आज आग लागली म्हणजे आगीचा बंब म्हणजे पिण्याचा टँकर पाठविण्याचा पराक्रमी आणि कोट्यावधी रुपयांचा चुराडा करण्याचा कार्यक्रम शासन करते! पाण्याचे नियोजन आणि आणि त्याचे न्याय्य वाटप हीच काळाची गरज आहे. त्यासाठी एक यज्ञच सर्वांनी थोडासा त्याग करून आखावा, एवढीच अपेक्षा! ‘एथ वडील जे जे करती तया नाम धर्मु ठेविती’ अशी ज्ञानदेवांनी धर्माची व्याख्या केलेली आहे. पाण्याचे न्याय्य वाटप हा एक नवीन धर्म संस्थापनेचा विचार आहे, त्यात जे सहभागी होतील ते हया समाजातील वडीलधारेच ठरतील.”
पाणी प्रश्नासाठी झगडणारे व काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी साळुंखेंचे हे विचार मार्गदर्शक आहेतच पण आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठीही ते मोलाचे आहेत.
– प्रतिक पुरी
माहिती संदर्भः इंटरनेट, विकली साधना