आतापर्यंत इतर राज्यांपासून लांब वाटत असलेलया जम्मू -काश्मीरची कनेक्टिव्हीटी वाढवण्याकडे केंद्र सरकारचे विशेष प्रयत्न असल्याचे अनेक प्रकल्पांमधून दिसून येत आहे. त्यातच आता आणखी भर पडणार असून जम्मू-काश्मीर हे नजीकच्या भविष्यात कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत देशातील सर्वात प्रमुख राज्य बनणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दिली
2047 पर्यंत विकसित भारतासाठी घेतलेला संकल्प समृद्ध जम्मू-काश्मीरसह पूर्ण होईल. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये 50 हजार कोटी रुपये खर्चून चार कॉरिडॉर तयार केले जात आहेत. पाच रोपवे बांधण्यात येणार आहेत. असे त्यांनी सांगितले.
आशिया खंडातील हा सर्वात उंच बोगदा
गडकरी म्हणाले की, या बोगद्यासोबतच आम्ही 14 किलोमीटर लांबीचा झोजी ला बोगदा बांधत आहोत. त्याचा अप्रोच रोड 18 किलोमीटर लांबीचा असेल आणि तो तयार करण्यासाठी 6800 कोटी रुपये खर्च येणार आहेत. पुढे ते म्हणाले की, मला सांगायला आनंद होत आहे की, जेव्हा आम्ही पाचव्यांदा निविदा काढली होती, तेव्हा आम्ही त्याची किंमत 12 हजार कोटी रुपये ठरवली होती, परंतु आता आम्ही ती फक्त 6800 कोटी रुपयांमध्ये तयार करणार आहोत. म्हणजे यामध्ये आम्ही सुमारे पाच हजार कोटी रुपये वाचवले. ते म्हणाले की, आम्ही या बोगद्याचा एक वर्ष अभ्यास केला. आशिया खंडातील हा सर्वात उंच बोगदा आहे. त्याच्या बांधकामामुळे, श्रीनगर-लेह रस्ता प्रवासासाठी साडेतीन तास कमी वेळ लागेल.
पाच रोपवे बनवले जातील
गडकरी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये 15 हजार कोटी रुपयांचे 54 रोपवे प्रस्ताव आले आहेत. पहिल्या टप्प्यात 2 हजार कोटी रुपये खर्चून पाच रोपवेचे काम केले जाणार आहे. यामध्ये 113 कोटी रुपये खर्चून शंकराचार्य मंदिरापर्यंत एक किलोमीटर लांबीचा रोपवे बांधण्यात येणार आहे.
बालटाल ते अमरनाथच्या पवित्र गुहेपर्यंत 221 कोटी रुपयांचा 11.6 किमी लांबीचा रोपवे बांधण्यात येणार आहे. सोनमर्गच्या थजवास ग्लेशियरमध्ये 200 कोटी रुपये खर्चून 1.6 किमी लांबीचा रोपवे बांधण्यात येणार आहे.
560 कोटी रुपये खर्चून भदरवाह ते सेओजधर असा सात किलोमीटर लांबीचा रोपवे बांधण्यात येणार आहे. 240 कोटी रुपये खर्चून नाश्री ते सणसर असा तीन किमी लांबीचा रोपवे बांधण्यात येणार आहे.
कठुआ-बसोहली-भदेरवाह-डोडा कॉरिडॉरबाबत गडकरी म्हणाले की, 30,400 कोटी रुपयांचा हा प्रकल्प 250 किलोमीटर लांबीचा आहे. डीपीआर तयार करण्यात येत आहे. या वर्षीच्या सुरुवातीला काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. यामुळे पंजाबहून श्रीनगरला जाणारे लोक कठुआहून थेट श्रीनगरला जाऊ शकतात. गडकरी म्हणाले कठुआ- या कॉरिडॉरवर कठुआ-डोडा दरम्यान 47 किमीचे 33 बोगदे बांधले जातील. सध्या बनी-भदेरवाह रस्ता चार महिने बंद आहे.