हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ज्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आहे तशा विद्यार्थ्यांना जपान सरकारने (Japan Government) एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. जपानच्या सरकारने भारतीय विद्यार्थ्यांसाठी (Indian Student) MEXT शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत २०२५ साठीच्या अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ही शिष्यवृत्ती जपानी भाषा शिकणाऱ्या, त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या आणि जपानमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
शिष्यवृत्तीचा उद्देश आणि फायदे
MEXT शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य वाढवणे आणि जपानबरोबर इतर देशांमधील संबंध अधिक मजबूत करणे हा आहे. या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा १,१७,००० येन (सुमारे ६३,६०० रुपये) आर्थिक मदत केली जाणार आहे. यासह, शिक्षणासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही आणि विद्यार्थ्यांच्या जपानपर्यंतच्या दोन्ही बाजूंच्या विमानप्रवासाचा खर्चही जपान सरकार उचलणार आहे.
पात्रता आणि निवड प्रक्रिया
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जन्म २ एप्रिल १९९५ ते १ एप्रिल २००७ दरम्यान झालेला असावा. मात्र, फक्त पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी अर्ज स्वीकारले जातील. विद्यार्थ्याने अर्जापूर्वी कमीत कमी एक वर्ष जपानी भाषा आणि संस्कृतीचा अभ्यास केलेला असावा. तसेच त्याची एखाद्या जपानी विद्यापीठात निवड झालेली असावी.
या शिष्यवृत्तीअंतर्गत एकूण ९ विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यांनाच ऑक्टोबर २०२५ पासून शिष्यवृत्ती दिली जाईल. लक्षात घ्या की, निवड प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडेल. प्रथम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी केली जाईल. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाईल. शेवटी निवडक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल.
अर्ज कसा करायचा?
विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. कारण प्रत्येक विद्यापीठाच्या अर्ज प्रक्रिया आणि अंतिम मुदती वेगवेगळ्या असतात. याकाळात विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा करून ठेवावीत आणि निवड प्रक्रियेसाठी तयारी सुरू करावी.




