Jawan Movie Review | मुर्दाड, जुलमी व्यवस्थेला जाब विचारणारा लढवय्या ‘जवान’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

योगेश जगताप | तुम्हाला खरं सांगू? तुम्ही याला माझा अहंकार म्हणाल किंवा इतर काही..पण बॉलिवूड इंडस्ट्रीचा मी शेवटचा सुपरस्टार आहे. अनुपम खेर यांच्या एका टीव्ही शोला दिलेल्या मुलाखतीतलं शाहरुख खानचं (Shahrukh Khan)  हे वाक्य. कोरोना संकटानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीला आलेली मरगळ घालवण्याचं काम यंदाच्या वर्षी शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने केलं. तोच कित्ता गिरवत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या जवान चित्रपटाने (Jawan Movie Review) बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एंट्री केली आहे. या चित्रपटाने शाहरुखचं सुपरस्टार असणं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. तिकीटबारीवर विक्रमांची राळ उडवून देणाऱ्या या चित्रपटातून दिला जाणारा संदेश देशातील सामान्य नागरिकांसोबतच राजकारण्यांना अंतर्मुख करायला लावणारा आहे.

एटली कुमार या दाक्षिणात्य दिग्दर्शकाने तमिळ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीला केंद्रित ठेवून हा चित्रपट उभा केला आहे. विजय सेथुपती, नयनतारा या तमिळ कलाकारांनी बॉलिवूडमधलं आपलं दिमाखदार पदार्पण केलं आहे. नयनताराने साकारलेली डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याची तसेच विजयने साकारलेली काली या खलनायकाची भूमिका तगडी झाली आहे. याशिवाय सुनील ग्रोव्हर, दीपिका पादुकोन, सान्या मल्होत्रा, संजय दत्त यांच्या चित्रपटातील भूमिका लक्षवेधी आहेत.

देशात होणाऱ्या निवडणुकांच्या माध्यमातून जे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो, ते आपली जबाबदारी पार पाडतात का? त्यांचा हलगर्जीपणा, भ्रष्टाचार सामान्य माणसांच्या मुळावर कसा उठतो याचं वास्तव आपण वर्षानुवर्षे टीव्हीवरच्या किंवा वर्तमानपत्रांतील बातम्या वाचून, बघून समजून घेतलं आहे. सिस्टीम नावाच्या प्रकाराशी खेळणारे राजकारणी, उद्योगपती यामुळं प्रामाणिक, कष्टाळू जनतेची, अधिकाऱ्यांची होणारी अवस्था आपण मागील काही वर्षांत पाहिली. आपल्या समस्या नेमक्या कुणाला सांगायच्या? त्या सोडवण्याचा खात्रीशीर काही मार्ग असतो का? राजकारणी आणि उद्योगपतींची ताकद जास्त असेल तर त्याचा सामना करणं कधीच शक्य नाही का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न जवान चित्रपटातून करण्यात आला आहे. चित्रपटाची गरज म्हणून कुणीतरी नायक उभा करावा लागतो, मात्र वास्तव आयुष्यात अशा नायकाची कमी आपणच भरून काढायची असते हा मौलिक संदेशही चित्रपटातून समर्पकपणे देण्यात आलाय.

विक्रम राठोड (शाहरुख खान) या देशभक्त जवानाची सिस्टीमशी लढण्याची कहाणी हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. जवळपास ६ ते ७ वेगवेगळ्या भूमिका साकारताना शाहरुखने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची किमया साधली आहे. या कहाणीत पिचलेल्या, अन्यायग्रस्त महिलांना महत्त्वाचं स्थान आहे. हा चित्रपट जेवढा शाहरुखचा आहे तेवढाच सहायक भूमिका केलेल्या ७-८ मुली/महिलांचा आहे. अनिरुद्ध रवीचंदर या तरुण संगीतकाराने चित्रपटातील जवळपास सगळया गाण्यांना संगीत दिलंय. अरिजित सिंग आणि शिल्पा राव यांनी गायलेलं चलेया हे गाणं रोमँटिक मूडला साजेसं आहे. तर बॉलिवूडमधलं सर्वात महागडं गाणं (एकूण खर्च – १५ करोड) अशी चर्चा असणारं जिंदा बंदा हे गाणं चित्रपटाच्या पूर्वार्धात माहोल बनवणारं आहे. चित्रपटाला इतरही २-३ हलक्या फुलक्या गाण्यांची जोड देण्यात आली आहे, जी प्रेक्षकांना काहीशी अनावश्यक वाटू शकतात.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी एका मुलाखतीत शाहरुख खान म्हणाला होता, “आता माझं वय ५७ वर्षं आहे. मी माझ्या मुलाच्या वयाचा विचार करून त्यांना कुठली भूमिका आवडेल ते करायचं ठरवलंय. आताची मुलं सुपरहिरो कल्चरच्या प्रेमात आहेत. जवान हा ऍक्शनपट व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या प्रामाणिक सुपरहिरोचीच कहाणी आहे.” फिर भी दिल हे हिंदुस्थानी, स्वदेस, चक दे इंडिया, माय नेम इज खान या चित्रपटांच्या पठडीत बसणारा पण तरीही स्वतःचं वेगळेपण असणारा जवान चित्रपट आहे.

सध्याच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा, व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिंमत करणारा, सामान्य माणसाला प्रोत्साहन देणारा हा ऍक्शनपट दीर्घकाळ चर्चेत राहणारा असेल यात शंका नाही.

हॅलो महाराष्ट्र रेटिंग – 4/5