राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात 2024 ला भाजपचे ‘चौघे’ कमळ फुलवणार; जयकुमार गोरेंचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राज्यात भाजप आणि शिवसेनेच्या वतीने (शिंदे गट) सावरकर गाैरव यात्रा काढण्यात येणार आहे याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी त्यांना आगामी 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होईल असे सांगितले तसेच सातारा जिल्ह्यात माझ्यासह भाजपचे कराड दक्षिणचे नेते अतुल भोसले, कराड उत्तरचे नेते धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे विधानसभेच्या निवडणुकीत आमदार होणार असा दावा केला.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात भाजप जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी पत्रकारकर परिषद घेतली. यावेळी अतुल भोसले, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार उपस्थित होते. यावेळी गोरे यांनी ‘रामराजेंना कोरेगाव तालुक्यात काॅरिडाॅर हवा. राष्ट्रवादीचे माणमधील नेते म्हसवडला होण्यासाठी आंदोलन करतात. आता म्हसवडलाच काॅरिडाॅर होणार असून यासाठी कोणीही फूस लावू द्या. कारण, सत्ता असताना रामराजेंचे शहाणपण चालू दिले नाही. आता त्यांच्याकडे सत्ताच नाही,’ असा टोला लगावला. तर संजय राऊत यांच्यावर मिरजच्या हाॅस्पिटलमध्ये तपासणी करावी लागेल अशी टीका केली.

यावेळी जयकुमार गोरे म्हणाले, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी हे मागील काही वर्षांपासून अपमानकारक वक्तव्ये करत आहेत. त्यांनी सावरकर यांना बदनाम करण्याचा अजेंडाच ठेवला आहे. त्याला विरोध करण्यासाठी भाजप-शिवसेनेने राज्यात ‘सावरकर गाैरव यात्रा’ काढण्याचे नियोजन केले आहे. सातारा जिल्ह्यातही भाजपकडून या यात्रेचे नियोजन झालेले आहे. ३१ मार्चपासून ही यात्रा सुरु होणार असून ६ एप्रिलपर्यंत चालेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात यात्रा निघेल. मोठ्या गावातून यात्रा जात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार लोकांत पोहोचविण्याचे काम करेल.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचे हिंदुत्वाचे विचार घेतले. तर इंदिरा गांधी यांनी सावरकर यांचा सन्मान केला. उध्दव ठाकरे हे महाविकास आघाडीत आहेत. त्यांची सत्तेसाठी आघाडी झाली, तेथे विचार नव्हता. उध्दव ठाकरे सावरकरांसाठी आघाडी सोडणार आहेत का ? हा विषय आहे. तर संजय राऊत यांना मिरजलाच तपासणीसाठी नेले पाहिजे. कारण, तेथे कृपामाई हाॅस्पिटल चांगले आहे. विनाकारण लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राऊत असे वक्तव्य करीत आहेत, अशा शब्दांत गोरे यांनी त्यांचा समाचार घेतला.