हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूकीत आपण जनतेला आवाहन केले होते की, लोकसभेला फलटणच्या मिशीवाल्याला पाडा अन विधानसभेला माणच्या दाढीवाल्याला पाडा… जनतेने मिशीवाल्याचा करेक्ट कार्यक्रम लावलाय. आता वेळ आली आहे ती माणच्या दाढीवाल्याची… मतदारसंघात जयकुमार गोरेने (Jayakumar Gore) जी दहशत व हुकुमशाही चालवली आहे. ती संपवण्याची सुपारीच मी जनतेच्या वतीने घेतलीय… हे स्टेटमेंट आहे शेखर गोरे (Shekhar Gore) यांचं… आपल्या सख्ख्या भावाच्या विरोधात त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता मान खटावमध्ये विधानसभेला नेमकं काय घडणार? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय… 2009 पासून आधी अपक्ष, मग काँग्रेस आणि आता भाजप अशी अनेक पक्षात कोलांट्या उड्या मारूनही मान खटावनं कौल दिला तो जयकुमार गोरे यांनाच… 2019 ला तर सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी एकत्र येत यंदा काहीही झालं तरी यंदा जयकुमार गोरेंना आमदारकीला पाडायचंच, असं म्हणून आमचं ठरलंय! या फॉर्म्युलाखाली एकत्र येऊनही कुणी कितीबी समोर येऊंद्या त्यांना एकटा बास! हे परफेक्ट लागू होत पुन्हा आमदार झाले ते जयकुमार गोरेच… त्यामुळे गोरे मान खटावच्या राजकारणातील गेमचेंजर म्हणून ओळखले जातायत… त्यामुळे आमदारकीची हॅट्रिक करणाऱ्या गोरेंना यंदा चौकार रोखण्यापासून कुणी रोखणार का? जयकुमार यांच्या राजकारणाला मतदारसंघात नडण्याची कुणाची ताकद आहे? या सगळ्या पाडापाडीच्या राजकारणात मान खटावच्या पाणी प्रश्नाला संभाव्य आमदार कितपत हात घालतील? त्याचाच घेतलेला हा आढावा…
माण आणि खटाव (Maan Khatav) …सुरुवातीला वेगवेगळे असणारे हे विधानसभा मतदारसंघ 2009 ला एकत्र झाले .. पूर्वीचा माण विधानसभा मतदारसंघ हा स्वातंत्र्यापासून 2009 पर्यंत कायम राखीव होता. पण या मतदारसंघावर तब्बल 40 वर्ष सदाशिवराव पोळ या हुकमी एक्क्याचा शब्द चालायचा… पोळ ज्याच्याकडे बोट करतील तो उमेदवार इथून निवडून यायचा… तब्बल 40 वर्ष त्यांचा या तालुक्यावर दरारा होता… त्यामुळे त्यांना या मतदारसंघात किंगमेकर म्हणून ओळखले जायचं…. पण दस्तूर खुद्द पोळ 2009 साली माण खटाव मधून आमदारकीसाठी उभे असताना त्यांच्या विरोधात अपक्ष लढत दिलेल्या जयकुमार गोरेंनी पोळ यांच्या प्रस्थापित राजकारणाला नख लावत आमदारकी खेचून आणली… तेव्हापासून सदाशिवराव पोळ यांच्या राजकारणाचा सूर्य मावळत गेला… तर दुसऱ्या बाजूने जयकुमार गोरेंनी मान खटावमध्ये सब कुछ गोरे! असं वातावरण तयार केलं… तसं फारसं कुणाला माहीत नसणार हे नाव चर्चेत आलं ते तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सलगीमुळे… आपल्याच तालुक्यातील एक अपक्ष आणि तरुण आमदार म्हणून पृथ्वीराज बाबांनी गोरेंना साथ दिली… मतदारसंघातील पाणी प्रश्नासाठी जमेल तितका निधी मिळवून दिला…जयकुमार गोरे चव्हाण यांच्या इतक्या संपर्कात आले होते की मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी सर्वाधिक भेट याच तालुक्याला दिली होती…
अर्थात काँग्रेसकडे झुकलेल्या जयकुमार गोरेंनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीआधी ऑफिशियली काँग्रेस पक्षात प्रवेश केला….आणि निवडणूक लढवून जिंकली देखील… पण सत्तेत आलं ते भाजप सरकार…2019 पर्यंतची भाजप सरकारची पहिली टर्म पूर्ण होईपर्यंत गोरे फडणवीसांच्या संपर्कात आले…काँग्रेस टू भाजप असा प्रवास करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला… आणि 2019 ला हाय व्होल्टेज ठरलेल्या मान खटावच्या आमदारकीच्या निवडणुकीला विरोधकांच्या एकजुटीला फोडून काढत जयकुमार गोरे यांनी आपली ताकद दाखवून दिलीच…मात्र या पंचवार्षिकला त्यांनी कुठेही हालचाल केली नसल्यामुळे सध्या तरी महायुती आघाडीकडून भाजपचे आमदारकीचे उमेदवार म्हणून ते लढत देताना दिसतील… पण विरोधात कोण? यावर अजून एकमताने काही शिक्कामोर्तब झालेलं दिसत नाहीये…
2019 च्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना आमदार होऊच द्यायचं नाही यासाठी सर्वच पक्षातील प्रतिस्पर्धींनी शड्डू ठोकला… रणजितसिंह देशमुख, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, प्रभाकर घारगे, दिलीप येळगावकर, सुरेंद्र गुदगे या आणि अशा अनेक पहिल्या फळीतील नेत्यांनी गोरेंच्या विरोधात एक पक्का उमेदवार द्यायचा… आणि त्याच्या पाठीमागे ताकद लावून त्याला निवडून आणायचं…. असं म्हणत आमचं ठरलंय! या पॅटर्न खाली ते एकत्र आले होते… जयकुमार गोरेंच्या विरोधात आमचं ठरलंय या पॅटर्नचे प्रभाकर देशमुख हे अपक्ष उमेदवार होते… आता काहीबी झालं तरी गोरे पडणार म्हणजे पडणारच…असा सगळ्यांचाच समज झाला होता…पण निकाल लागला आणि गोरे पुन्हा एकदा जायंट किलर ठरत सलग तिसऱ्यांदा मान खटाव मधून आमदार झाले….
मान खटावच्या राजकारणाचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला इथल्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालत नाही… या ठिकाणी ग्रामस्थांच्या दहा एकर पासून ते शंभर एकर पर्यंत जमिनी आजही आहेत. काही ठराविक भाग सोडला तर सर्व जमिनी पाण्याची कमतरता असल्याने पडून आहेत आणि पाणी हाच विषय पुढे करत अनेक राजकारण्यांनी इथलं राजकारण पाणी प्रश्नभोवती झुलवत ठेवलं… मात्र, आज अखेर तुरळक पाण्याचे रिसोर्सेस तयार करण्यापलीकडे या मतदारसंघात कोणालाच पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवता आलेला नाही. पाणी परिषदांसारखी असंख्य आंदोलनं मतदारसंघातमतदारसंघात आजही पाहायला मिळतात. निवडणुकीच्या कालावधीत या भागात पाण्याच्या प्रश्नावरुन स्टेज गाजत असल तरी मुळात या भागात अनेक निवडणुकीत पाण्यापेक्षा जातीचा फॅक्टर महत्त्वाचा ठरताना दिसून आला… इतर आमदारांपेक्षा किमान पाण्यासाठी थोडीफार हालचाल आमदार साहेबांनी केली असली तरी संपूर्ण मतदारसंघात पाणी पोहोचवण्यात ते आजही फेल झालेले दिसतात… टेंभू, ताकारी, तारळी, जिहे कटापुर या चार योजनेच्या पाण्याने मान खटावची तहान भागवण्याचा लढा अनेक वर्षांपासून सुरू आहे… पण यातही जयकुमार गोरे यांना यश आलेले नाहीये… थोडक्यात काय तर पाण्याच्या प्रश्नावरून जयकुमार गोरे यांची पंधरा वर्षांची कारकीर्द ही निराशा जनकच म्हणावी लागेल…
पण दुसरीकडे लोकनेते, जनसंपर्क आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेला त्यांच्या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला मिळालेलं लीड पाहता तालुक्याचं पॉवर पॉलिटिक्स आजही त्यांच्याकडे झुकलेलं पाहायला मिळतं… गेल्या वेळेस विरोधात असणारे संदीप पोळ सध्या भाजपमध्ये आल्याने आणि येळगावकर सुद्धा जयकुमार गोरे गटात असल्यानं गोरे यंदाही विधानसभेच्या निवडणुकीला प्लसमध्ये दिसतायेत… तर करंट स्टेटसमध्ये त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे प्रभाकर देशमुख किंवा काँग्रेसचे रणजीत देशमुख हे लढत देताना दिसतील… सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने असणारं वारं, त्यात मराठा वर्सेस ओबीसी फॅक्टर आणि गोरे यांच्याबद्दल असणारी अँटी इनकंबनसी पाहता माण खटावचा निका ल फिरण्याचे चान्सेसही वाढतात…आता गोरेंच्या विरोधात पुन्हा एकदा एकत्र येत आमचं ठरलंय चा पार्ट टू काढण्यात विरोधकांना यश येईल का? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल… बाकी यंदा या विरोधात मोहिते पाटलांचही नाव ऍड झालेलं असेल… बाकी मान खटावचा 2024 चा आमदार कोण? जयकुमार गोरे की कुणी दुसरा? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.