हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून अजित पवार गट (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) गट कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहे. आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी केला आहे. त्याचबरोबर, लवकरच आता अजित पवार गटातील आमदारांचा आकडा 53 वर पोहचणार असे संकेत ही आत्राम यांनी दिले आहेत. ज्यामुळे शरद पवारांच्या गोटात खळबळ माजली आहे.
जयंत पाटील यांच्या विषयी दावा करताना धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटले आहे की, “शरद पवार गटाचे जे नेते दावा करत फिरत आहे की आमच्या संपर्कात अजित पवार गटाचे 15 आमदार आहे. मात्र दावा करणारेच जयंत पाटील हेच आमच्या संपर्कात आहे. आमच्या गटाच्या आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही. दर मंगळवारी अजित पवार हे आमदाराची बैठक घेतात. त्याच्या समस्या , मतदार संघातले ऐकून घेतात. हे आधी होत नव्हतं म्हणून सर्व आमदारांनी बाहेर पडायचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व आमदार अजित पवार गटात येऊन खूश आहेत”
त्याचबरोबर, “शरद पवार गटाचे उरलेले आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे लवकरच आमच्या आमदारांचा आकडा हा 53 वर पोहचणार आहे. आमची लोकसभेची मिशन 45 ची तयारी सुरु झाली आहे. मी गडचिरोली लोकसभा मतदार संघात लढायला इच्छुक असल्यामुळे तयारीच्या कामाला देखील केली आहे.” अशी माहिती आत्राम यांनी दिली आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून संघटन बांधणीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र, सध्या शरद पवार गटातील काही नेते अजित पवार गटात जातील अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे या चर्चांनी शरद पवारांची डोकेदुखी वाढवली आहे. पुढे जाऊन ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटातील नेते अजित पवार गटात गेल्यास त्याचा मोठा तोटा शरद पवारांना बसू शकतो.