Jayant Patil Meet Madan Bhosale : साताऱ्यातील भाजपचा नेता ‘तुतारी’च्या वाटेवर? जयंत पाटलांसोबत कमराबंद चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुका जस जस जवळ येत आहेत तस तस शरद पवारांनी आपले डाव टाकायला सुरुवात केली आहे. महायुतीतील नाराज नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी शरद पवार गट फासे टाकत आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील कागल मतदारसंघात भाजप नेते समरजित घाटगे यांनी तुतारी घेण्याची घोषणा केली होती. आता कोल्हापूरनंतर सातारा भाजपची झोप उडवणारी बातमी समोर येत आहे. वाई मतदार संघातील भाजप नेते मदन भोसले (Madan Bhosale) यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बंद कमराआड चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावरील हास्य जणू काय भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्याचेच संकेत देत होते.

मदन भोसले हे वाई तालुक्यातील भाजपचे बडे नेते आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सध्या अजित पवार गटात असलेल्या मकरंद पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना दारुण पारभाव पत्करावा लागला. सध्या अजित पवार गट हा भाजपसोबत महायुतीत आहे. त्यामुळे वाई विधानसभा मतदारसंघाची जागा सुद्धा विद्यमान आमदार मकरंद पाटील यांनाच सुटण्याची दाट शक्यता आहे. हाचधोका कदाचित मदन पाटील याना असू शकतो. त्यामुळे वाईतील एकूण सर्व समीकरणे बघता मदन पाटील हे उमेदवारीसाठी शरद पवार गटात जाणार का अशा चर्चाना बळ आले आहे.

जयंत पाटील यांच्यासोबत मदन भोसले यांनी बंद कमराआड बराच वेळ चर्चा केली. या चर्चेचा तपशील दोन्ही नेत्यांनी उघड केलेला नाही. भाजपमधील सर्वजण माझे मित्र आहेत असं म्हणत जयंत पाटील यांनी जास्त बोलणं टाळलं. परंतु जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बरंच काही सांगत होते. गुपचूप पणे साताऱ्यात जयंत पाटलांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला का? अशा चर्चा सुरु आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या अनेक बड्या नेत्यांना शरद पवार गटाने गळाला लावल्याची चर्चा सुरु आहे. सर्वात आधी कोल्हापूरचे राजे समरजीत घाटगे यांनी आपण शरद पवार गटात जाणार हे जाहीर केलं आहे. इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे सुद्धा पवारांची तुतारी हाती घेतील असं बोललं जात आहे कारण त्याठिकाणी सुद्धा अजित पवार गटाचे दत्तामामा भरणे हे विद्यमान आमदार आहेत. याशिवाय जुन्नरचे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी सुद्धा आज दुसऱ्यांदा शरद पवारांची भेट घेतल्याने ते सुद्धा लवकरच घड्याळ सोडून तुतारी वाजवतील असं बोललं जातंय. त्यातच आज जयंत पाटील यांनी मदन भोसले यांची भेट घेतल्याने पवारांनी आणखी एक नेता आपल्याकडे वळवला का अशा चर्चाना उधाण आलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पटलावर शरद पवारांनी टाकलेले हे डाव भाजपचा करेक्ट कार्यक्रम करतील असं बोललं जातंय.