व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

प्रकल्प गुजरातला जात आहेत आणि मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेदांत फॉक्सकॉननंतर आता टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेला आहे. यावरून विरोधकांनी शिंदे – फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे हे यातून स्पष्ट होते. महाराष्ट्रातील सत्तांतर राज्याला वेठीस धरण्यासाठी झाले आहे का? असा प्रश्न सध्या पडत आहे. गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? असा सवालही जयंत पाटील यांनी केला.

दरम्यान, वेदांता फॉक्सकॉन गुजरातला गेल्याचा वाद निवाळतो तोच आता नागपूरला होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय आरोप -प्रत्यारोप सुरु झाले आहेत. विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मात्र हा प्रकल्प मागील वर्षीच म्हणजे महाविकास आघाडीच्या काळातच गुजरातला गेल्याचा दावा केला आहे. तसेच हा प्रकल्प परत महाराष्ट्रात यावा यासाठी गेल्या सरकारकडून साधं एक पत्रही केंद्र सरकारकडे गेलं नाही, असा उलट आरोप उदय सामंत यांनी केला आहे.